Last Updated on 18 Sep 2022 5:06 PM by Sanjay Patil/Adhorekhit
गावठाण मोजणीवर आक्षेप : अंगावर धावत शिवीगाळ : शासकीय कामात अडथळा
सांगली । भूमिअभिलेख कार्यालयाकडुन सुरु असणाऱ्या गावठाण भूमापन कार्यक्रमात स्थळ पाहणी करताना अडथळा निर्माण करत ग्रामपंचायतच्या महिला ग्रामसेविका व कर्मचाऱ्याला शिवीगाळ व धमकी देण्याचा प्रकार मासाळवाडी (ता. आटपाडी) गावात घडला.ग्रामसेविका पुनम गेजगे व ग्रामपंचायत कर्मचारी दादासो तळे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
मासाळवाडी या गावात भूमिअभिलेख कार्यालयाकडुन शासनाच्या स्वामित्व योजना ड्रोनव्दारे गावठाण भूमापनयोजना राबविली जात आहे. शुक्रवारी दुपारी भूमिअभिलेखचे अधिकारी अशोक चव्हाण,एम.एम. विभुते,प्रियांका भाले यांच्यासह मासाळवाडी ग्रामसेविका,ग्रामपंचायत कर्मचारी हे स्थळपाहणी व चौकशी करत फिरत होते.यावेळी रेशनदुकानदार अण्णा सोमनाथ मेटकरी याने या कामावर आक्षेप घेत ग्रामसेविका पुनम गेजगे यांच्याबद्दल अपशब्द वापरले.ग्रामसेविकेला शिवीगाळ करत अंगावर धावून जाण्याचा प्रकारही अण्णा मेटकरी याने केला.
ग्रामसेविका मनाने जागेच्या नोंदी घालते.सर्व्हे बोगस आहे.मॅडम मनमानी कामकाज करते,असे म्हणत शासकीय काम बंद पाडले.ग्रामसेविका पुनम गेजगे यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी दादासो तळे या दोघांना सर्जेराव बजरंग मासाळ याने शिवीगाळ करत सर्व्हे बोगस असून तो बंद करा असे म्हणत दमदाटी केली. तसेच मारहाणीसाठी अंगावर जाण्याचा प्रकारही मासाळने केला.
भूमिअभिलेखच्या सर्व्हेच्या निमित्ताने ग्रामसेविका व कर्मचाऱ्याला शिवीगाळ,धमकी व शासकीय काम बंद पडण्याचा प्रकार घडल्याने हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले.ग्रामसेविका पुनम गेजगे व ग्रामपंचायत कर्मचारी दादासो तळे यांच्या फिर्यादीवरून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.









































































