Last Updated on 19 Jun 2023 8:39 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । अर्धा जून महिना उलटून गेला तरी राज्यात मान्सून सक्रीय झालेला नाही.यामुळे मान्सूनची प्रगती मंदावल्याने पेरण्या देखील रखडल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून अशातच राज्यात सगळ्यांच्या नजरा लागून असलेल्या मान्सूनसंबंधी आता हवामान खात्याकडून आनंदाची बातमी दिली आहे.येत्या 72 तासांमध्ये मान्सून मुंबईत हजेरी लावणार आहे.त्यामुळे मुंबईकरांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
यंदा मान्सून 8 जूनला केरळमध्ये दाखल झाला होता.परंतु, बिपरजॉय चक्रीवादळाचा फटका मान्सूनला बसल्याने पाऊस लांबणीवर गेला.तसेच 11 जून रोजी मान्सून कोकणात दाखल झाला होता.मात्र,बिपरजॉय चक्रीवादळामुळे त्याची पुढील वाटचाल बिघडली.आता बिपरजॉय चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाल्याने मान्सूनसाठी राज्यात अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे.
येत्या 72 तासांत मान्सून मुंबई, पुणे, महाराष्ट्राचा दक्षिण मध्य भाग, कोकण, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्राचा इतर भाग व्यापण्याची शक्यता आहे. तर 23 जूनपासून मान्सून अधिक सक्रिय होईल, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे.यामुळे जूनचा शेवटचा आठवडा हा धुवांधार पावसाचा असेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.














































































