Last Updated on 26 Nov 2022 8:26 PM by Sanjay Patil/Adhorekhit
![]()
सांगली । लोकनेते राजारामबापू पाटील यांचे नातू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष,माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांचे चिरंजीव,युवा नेते प्रतिकदादा पाटील आणि उद्योगपती राहुल किर्लोस्कर यांची कन्या अलिका यांचा शुभ विवाह राजारामनगर (इस्लामपूर) येथे रविवार दि. 27 नोव्हेंबर रोजी 5.35 वाजता संपन्न होत आहे.तब्बल दोन लाख लग्नपत्रिका देण्यात आल्या आहेत.
या लग्न सोहळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार,विरोधी पक्ष नेते अजित पवार,खासदार सुप्रिया सुळे,माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक मंत्री,खासदार,आमदार, साखर कारखान्याचे अध्यक्ष,विविध पक्षांचे राज्यपातळीवरील नेते,राष्ट्रवादी काँग्रेससह विविध पक्षातील दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.या विवाह सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात येत आहे.
इस्लामपूर-बहे रस्त्यावर राजे बागेश्वरच्या पूर्वेस लग्न सोहळ्याची भव्य व सुंदर व्यवस्था केली आहे. इस्लामपूर-बहे रस्त्याच्या बाजूलाच मुख्य प्रवेश उभा केलेले आहे.राजाराम बापू इनडोअर स्टेडियमच्या मागे पश्चिमेस तोंड करून देऊळ,घंटा,व फुलांच्या चित्रांनी सजविले भव्य व्यासपीठ उभा केलेले आहे.व्यासपीठाच्यासमोर विशेष मान्यवरांची बैठक व्यवस्था केली असून महिलांची स्वतंत्र बैठक व्यवस्था केलेली आहे.त्याच्या मागे सर्व निमंत्रितांची बैठक व्यवस्था केलेली आहे.हा सोहळा सर्वांना पाहता यावा म्हणून 8 एलई डी स्क्रीनची व्यवस्था केली आहे.
विशेष मान्यवरांनी राम मंदिराकडून,तर निमंत्रितांनी इस्लामपूर-बहे रस्त्याकडून प्रवेश करावा,अशी व्यवस्था केलेली आहे.
शेजारच्या बियाणे मळा परिसरात पंगत व बफे पध्दतीने भोजन व्यवस्था केलेली आहे.एकावेळी 5 हजार लोकांची भोजन व्यवस्था केली आहे.
तीन प्रकारच्या दोन लाख पत्रिका
या शाही विवाहाच्या सुमारे दोन लाख पत्रिकांचे वाटप करण्यात आले आहे.त्यात तीन प्रकारच्या पत्रिकेचा समावेश आहे.मान्यवरांसाठी एक,नातेवाईकांसाठी आणि मतदारसंघातील जनतेला देण्यासाठी एक अशा तीन प्रकारच्या पत्रिका वाटण्यात आल्या आहेत.त्यामुळे लग्नात मोठ्या संख्येने लोक येणार असल्याची माहिती आहे.
दोन लाख लग्नपत्रिका,मतदारसंघासह वाळवा तालुक्यात घरटी पोहोचलेले आग्रहाचे आवतन,हजारो चौरस फुटांचा शामियाना,चकाचक बनलेले रस्ते,एकाच वेळी हजारो लोकांची उदरभरणाची व्यवस्था आणि मातब्बरांच्या स्वागताची जय्यत तयारी…एका शाही विवाहासाठी इस्लामपूरनगरी सज्ज झाली आहे.
हा लग्न सोहळा भव्य व यशस्वी करण्यासाठी दिलीपराव पाटील,पी.आर.पाटील,प्रा.शामराव पाटील,अँड.चिमन डांगे,नेताजीराव पाटील,विनायक पाटील,बाळासाहेब पाटील,विजयराव पाटील,शहाजी पाटील,सुरेंद्र पाटील,देवराज पाटील,दादासो पाटील,संजय पाटील,आर.डी.सावंत,आर.डी. माहुली,एस.डी.कोरडे यांच्यासह राजारामबापू उद्योग समूह व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असंख्य पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच आ.जयंतराव पाटील यांच्या कुटूंबातील सदस्य उत्तम नियोजन करीत आहेत.
![]()
विवाह सोहळ्याबद्दल कुतूहल आणि चर्चा
या लग्न सोहळ्याकडे तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.या सोहळ्यास कोण-कोण मान्यवर येणार,किती लोक येणार,जेवणाचा मेनू काय असणार,पार्किंग व्यवस्था कशी असणार? याबद्दल जनतेत कुतूहल आहे.या लग्न सोहळ्यास विक्रमी लोक येतील,अशी चर्चा केली आहे.
![]()
वाहनांचे मार्ग व पार्किंग
कराड,पेठकडून,तसेच सांगली,आष्टया कडून येणाऱ्या वाहनांनी आंबेडकर नाका,एस्सार पेट्रोल,क्रांतिसिंहनगर मार्गे बहे रस्त्यावर यायचे आहे. क्रांतिसिंह नगर परिसरात दुचाकी,तर राजेबागेश्वर परिसरात चार चाकी वाहनांची पार्किंग व्यवस्था केलेली आहे.
ताकारी,बोरगावकडून येणाऱ्या वाहनांनी फार्णेवाडी,हुबालवाडीमार्गे येऊन एमआयडीसी परिसरात वाहनांचे पार्किंग करावयाचे आहे.याच परिसरात कि.म.गड, नरसिंहपूरकडून येणाऱ्या वाहनांचीही पार्किंग व्यवस्था केलेली आहे.
विशेष मान्यवरांची वाहने एस्सार पेट्रोल पंप,कारखाना पेट्रोल पंप,राम मंदीर मार्गे स्टेडियम परिसरात येतील.या परिसरात त्यांच्या वाहनांची पार्किंग व्यवस्था केली आहे.
![]()











































































