Last Updated on 12 Nov 2024 7:09 PM by Sanjay Patil/Adhorekhit
महाराष्ट्रासाठीच्या महायुतीच्या जाहीरनाम्यात एकाहून एक सरस संकल्प
चंद्रपूर । महाराष्ट्रासाठीच्या महायुतीच्या जाहीरनाम्यात शेतकरी, युवाशक्ती आणि लाडक्या बहिणींसाठी तसंच राज्याच्या विकासासाठी एकाहून एक सरस संकल्प घेण्यात आले असून, हा जाहीरनामा राज्याच्या विकासाची हमी बनेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडी म्हणजे भ्रष्टाचाराचा कळस असल्याची जोरदार टीका त्यांनी केली.
चिमूर इथल्या जाहीरसभेत ते बोलत होते.
डबल इंजिन सरकार म्हणजे विकासाचा दुप्पट वेग असं सांगून गेल्या अडीच वर्षांत जनतेनं हा वेग अनुभवल्याचं पंतप्रधान म्हणाले. चंद्रपूर आणि परिसरानं अनेक दशकांपासून नक्षलवादाची झळ सोसली आहे. नक्षलवादामुळे अनेक आयुष्य बरबाद झाली असून, औद्योगिक विकासापासूनही हा विभाग वंचित राहिला होता. मात्र, आपल्या सरकारनं नक्षलवादाला आळा घातल्यानं हा भाग मोकळा श्वास घेत असून, नवनव्या संधीही इथे निर्माण होत आहेत. नक्षलवादानं या क्षेत्रात पुन्हा डोकं वर काढू नये, यासाठी काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांना संधी देऊ नका, असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. राज्यातल्या शेतकऱ्यांचं काँग्रेस आणि आघाडीनं मोठं नुकसान केल्याचं सांगून जलयुक्त शिवार यासारख्या योजना त्यांनी रोखल्याचं स्मरण पंतप्रधानांनी करुन दिलं. महाविकास आघाडीनं राज्याच्या विकासाला खीळ घालण्याचं काम केलं. विकासकामं रखडवत ठेवणं, यात काँग्रेस तरबेज असल्याची टीका त्यांनी केली.
काँग्रेस आणि सहकाऱ्यांनी मेट्रोपासून वाढवण बंदर, समृद्धी महामार्ग यासारखी विकासकामं रोखली, असं सांगून महाविकास आघाडी म्हणजे भ्रष्टाचाराचा कळस असल्याची जोरदार टीका त्यांनी केली. काँग्रेसला लूट करण्याची संधी पुन्हा देणार का, असा सवाल त्यांनी केला. विदर्भातल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी, सोयाबीन उत्पादकांना एकरी पाच हजार रुपयांची मदत केल्याचं त्यांनी सांगितलं.
काँग्रेस आदिवासी समाजाला जाती-जातींमध्ये विभागत कमजोर करु इच्छिते असा आरोप करत त्यांनी विरोधकांवर टीका केली. काँग्रेसच्या षडयंत्राची शिकार होऊ नका, एकजूट राखाल तर सुरक्षित राहाल, असं सांगून एक रहेंगे तो सेफ रहेंगे याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला. एकजूट राखली नाही तर काँग्रेस आरक्षण काढून घेईल, असंही ते म्हणाले. संविधानाचा जप करणाऱ्या विरोधकांनी अनेक दशकांपासून काश्मीरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान लागू केलं नाही, अशी टीकाही त्यांनी केली. भाजपा महायुती सरकार सबका साथ सबका विकास हा मंत्र घेऊन काम करत असून महाराष्ट्राच्या समृद्धीसाठी शेतकऱ्यांना समृद्ध करायचं आहे, असं सांगून या सरकारनं गरीबांसाठी पक्की घरं, गावोगावी रस्ते, वीज, पाणीपुरवठा अशा अनेक केलेल्या विकासकामांची यादीच त्यांनी सादर केली. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल काय येणार आहेत, याचं उत्तर या सभेला उपस्थित असलेला विशाल जनसागर देत असल्याचं पंतप्रधान म्हणाले.











































































