Last Updated on 23 Sep 2024 5:18 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली | आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी भारत निवडणूक आयोगाचे अधिकारी 26 ते 28 सप्टेंबर 2024 दरम्यान मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. 27 सप्टेंबर रोजी आयोगाच्या अधिकाऱ्यांची विविध राजकीय पक्ष, एसपीएनओ, नोडल अधिकारी आणि सीपीएमएफ यांच्यासोबत निवडणुकीच्या सुरक्षेविषयी सखोल चर्चा होईल. यानंतर अंमलबजावणी यंत्रणांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित केली जाईल. त्याचदिवशी राज्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत देखील आयोगाच्या अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे.
28 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांसोबत निवडणूक तयारीचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर भारत निवडणूक आयोगाच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात येईल, असे आयोगाच्या पत्रात नमूद केले आहे.
दरम्यान, सार्वत्रिक निवडणुका जाहीर करण्यापूर्वी निवडणूक आयोगाकडून प्रत्येक राज्याचा आढावा दौरा करण्यात येतो. त्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा आहे. महाराष्ट्राच्या सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ नोव्हेंबरपर्यंत आहे. त्यापूर्वी नवं सरकार स्थापन होणं अपेक्षित आहे. त्यामुळं आता महाराष्ट्राच्या निवडणुका लवकरच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नेमक्या तारखा मात्र अद्याप जाहीर झालेल्या नाहीत.







































































