Last Updated on 23 Nov 2024 10:03 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली । महाराष्ट्र या देशासाठी महत्त्वाचं विकास इंजिन असून महाराष्ट्रातला जनादेश विकसित भारताचा मोठा आधार ठरेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. भाजपाला मिळालेल्या यशानंतर नवी दिल्लीत भाजपा मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
तुष्टीकरणाच्या राजकारणाचा सामना कसा करायचा ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रानं दाखवून दिलं असल्याचं मोदी म्हणाले. आपल्या भाषणात पंतप्रधानांनी काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजकारणावर घणाघाती टीका केली. एक है तो सेफ है, हा देशाचा महामंत्र बनला असून जात, धर्म, प्रांत या आधारे समाजात दुही पसरवू इच्छिणाऱ्यांना धडा शिकवला गेला आहे. समाजातल्या प्रत्येक वर्गानं महायुतीला मत दिलं असल्याचं पंतप्रधान म्हणाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देशासाठी मोठं योगदान दिलं. काँग्रेसनं मात्र त्यांचा कधीच आदर केला नाही, अशी टीका पंतप्रधानांनी केली. महाराष्ट्रातला विजय भाजपाच्या सुशासनाच्या मॉडलवर जनतेनं दाखवलेला विश्वास असून तो कायम ठेवण्यत आम्ही कुठलीही कसर ठेवणार नाही, अशी ग्वाही मोदी यांनी यावेळी दिली.
नकारात्मक राजकारण, कुटूंबशाही यांची हार आजच्या निकालातून झाली आहे, असं ते म्हणाले. विरोधकांनी सामान्य मतदाराची ताकद कमी लेखली. मात्र मतदार राष्ट्र प्रथम या भावनेसोबत असून मतदाराला अस्थिरा नको असते, तसंच विरोधकांनी ही आश्वासनं महाराष्ट्रात दिली होती, त्यांची इतर राज्यात काय अवस्था आहे, हेही महाराष्ट्राच्या जनतेनं समजून घेऊन सूज्ञपणे मतदान केलं, असं पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं कौतुक केलं. तसंच महायुतीतल्या सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं.











































































