Last Updated on 24 Oct 2024 6:53 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । राज्यात विधानसभा निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे. राज्यातील अनेक बड्या नेत्यांनी प्रचंड शक्तिप्रदर्शन करत गुरुपुष्यामृत योगाच्या मुहुर्तावर उमेदवारी अर्ज दाखल केले. प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवार घोषित केल्यानंतर आज अनेक मातब्बर उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केले. तर, उमेदवारीवरून काही पक्षात बंडखोरी होण्याची चिन्हे आहेत. इस्लामपूर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केला.
महाविकास आघाडीच्या वतीने इंदापूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.येवल्यामधून राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ, आंबेगावमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे पाटील, शिर्डी इथून भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील, कोथरुडमधून भाजपचे चंद्रकांत पाटील यांनी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरच्चंद्र पवार पक्षाच्या जयंत पाटील यांनी सांगलीच्या इस्लामपूर मतदारसंघातून तर काँग्रेच्या यशोमती ठाकूर यांनी अमरावती जिल्ह्यातल्या तिवसा मतदारसंघातून आज उमेदवारी अर्ज दाखल केला. मुंबईत मलबार हिल इथून भाजपचे मंगलप्रभात लोढा तर कांदिवली पूर्व मधून भाजपचे अतुल भातखळकर यांनी देखील आज अर्ज दाखल केला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आदित्य ठाकरे यांनी आज वरळी मतदार संघातून तर भाजपाच्या अमित साटम यांनी अंधेरी पश्चिममधून अर्ज दाखल केला. मुलुंड मतदार संघात भाजपाचे मिहिर कोटेचा यांनी तर मुंबईत विलेपार्ले विधानसभा मतदार संघातले भाजप उमेदवार पराग अळवणी यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. ठाणे मतदारसंघात मनसेचे उमेदवार अविनाश जाधव आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजन विचारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.शेतकरी कामगार पक्षाकडून चित्रलेखा पाटील यांनी अलिबाग मतदारसंघातून अर्ज दाखल केला. रत्नागिरी जिल्ह्यात राजापूरमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार राजन साळवी आणि शिवसेनेचे किरण सामंत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. दापोली मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार संजय कदम आणि शिवसेनेचे विद्यमान आमदार योगेश कदम यांनी अर्ज दाखल केले. चिपळूणमध्ये काँग्रेसच्या प्रशांत जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ विधानसभा मतदारसंघातून आज आमदार वैभव नाईक यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. अहिल्या नगर जिल्ह्यातल्या अकोलेतून राष्ट्रवादी काँग्रेसचे किरण लहामटे, नगर शहरमधून संग्राम जगताप तर राहता मधून डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. पारनेरमधून खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांनी तर राहुरीतून भाजपाचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. बीड जिल्ह्यात परळी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी तर कळमनुरी इथून शिवसेनेचे संतोष बांगर यांनी महायुतीकडून अर्ज दाखल केला. जालना विधानसभा मतदार संघासाठी शिवेसेचे अर्जुन खोतकर, काँग्रेसचे कैलास गोरंट्याल आणि त्यांच्या पत्नी संगीता गोरंट्याल, भाजपाचे भास्कर दानवे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. घनसावंगी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरच्चंद्र पवार पक्षाचे राजेश टोपे, बदनापूरमधून भाजपाचे नारायण कुचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरच्चंद्र पवार पक्षाचे बबलू चौधरी यांनी आज अर्ज दाखल केला. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी धाराशिवमधल्या भूम परंडामधून अर्ज दाखल केला. नांदेड लोकसभा मतदारसंघात आज काँग्रेसचे रविंद्र चव्हाण यांनी अर्ज दाखल केला. सोलापूर जिल्ह्यातल्या दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघासाठी भाजपाचे उमेदवार माजी मंत्री सुभाष देशमुख यांनी आज दुपारी अर्ज दाखल केला. शिवसेनेच्या संजय राठोड यांनी दिग्रसमधून तर भाजपाच्या विनोद अग्रवाल यांनी गोंदियातून अर्ज दाखल केला. यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातून भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आभा पांडे यांनी पूर्व नागपूर मतदारसंघातून अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे.
जयंत पाटील यांचा अर्ज भरताना रेकॉर्ड गर्दी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उरण-इस्लामपूर विधानसभा मतदारसंघासाठी इस्लामपूर तहसीलदार कार्यालयात अर्ज दाखल केला. यावेळी रेकॉर्ड प्रचंड गर्दी जमली होती.
भगिनी पंकजा आणि प्रीतम मुंडे यांच्या उपस्थितीत धनंजय मुंडेंनी भरला अर्ज
शिवसेनेचे उमेदवार तानाजी सावंत यांनी भरला उमेदवारी अर्ज
आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघातून भरला उमेदवारी अर्ज
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठया प्रमाणात शिवसैनिकांसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी रॅलीत सहभागी झाले होते. यावेळी महाविकास आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मोठं शक्तिप्रदर्शन वाजता,गाजत जयघोषात करण्यात आलं.
यावेळी शिवसेना नेते सुभाष देसाई, खासदार अरविंद सावंत, प्रियंका चतुर्वेदी, आमदार सुनील शिंदे, आमदार सचिन अहिर, माजी महापौर किशोरी पेडणेकर, माजी उपमहापौर शुभांगी वरळीकर आदी यावेळी उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील यांनी शक्तीप्रदर्शन करत भरला उमेदवारी अर्ज
कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघातून वैभव नाईक यांनी सादर केला उमेदवारी अर्ज
कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघातून वैभव नाईक यांनी आज आपला उमेदवारी अर्ज सादर केला. तत्पूर्वी कुडाळ येथे त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मेळावा घेतला. यावेळी महाविकास आघाडीचे जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर मोठ्या संख्येने जमलेल्या शिवसैनिकासह मिरवणुकीने येत वैभव नाईक यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
अनुजा सुनील केदार यांनी सादर केला उमेदवारी अर्ज
इंदापुरात हर्षवर्धन पाटलांनी भरला उमेदवारी अर्ज
इंदापुरात देखील यंदा तिरंगी लढत होणार आहे. येथे विधानसभेसाठी राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटातील प्रवीण माने यांनी बंडखोरी केली आहे. अजित पवार गटाकडून विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाकडून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दंड थोपाटले आहेत. आज खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत बाईक रॅली तसेच जोरदार शक्ती प्रदर्शन करीत हर्षवर्धन पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
ठाण्यातून राजन विचारे यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे विधानसभेचे उमेदवार राजन विचारे यांनी आज शिवसैनिकांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला. सकाळी ११ वाजता चरई येथील शिवसेना शाखेतून विचारे यांच्या रॅलीला सुरुवात झाली. या रॅलीमध्ये शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडी,युवासैनिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. टेंभी नाका येथील धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून विचारे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी दाखल केला.
वंचित बहुजन आघाडीचे लातूर शहर इथले उमेदवार विनोद खटके यांनी देखील आज अर्ज दाखल केला. त्यापूर्वी त्यांनी लातूर शहर परिसरात भव्य रॅला काढली. अलिबाग मुरुड विधानसभा मतदार संघातून, शेकाप च्या उमेदवार चित्रलेखा पाटील यांनी शेतकरी भवना पासून सायकल रॅली काढून आपला अर्ज दाखल केला. त्यांचा सामना शिवसेनेच्या महेंद्र दळवी यांच्याशी होणार आहे.












































































