Last Updated on 08 May 2023 2:32 PM by Sanjay Patil/Adhorekhit
बीड । येथील पुरुषोत्तमपुरीत मंदिराचा जीर्णोद्धार करताना महादेवाच्या पिंडीमध्ये सोन्याचे कासव सापडले आहे.पुरुषोत्तमपुरी येथे भगवान पुरुषोत्तमाचे देशातील एकमेव मंदिर गोदावरी नदीच्या काठावर आहे.या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सध्या सुरू असून हे काम सुरु असतानाच ही मूर्ती सापडली आहे.या आश्चर्यकारक घटनेनंतर भाविकांनी हे सोन्याचे कासव पाहण्यासाठी एकच गर्दी केली आहे.
या मंदिराची निर्मिती सातशे वर्षांपूर्वी राजा रामदेवराय यांनी केल्याचा इतिहास आहे.बीड जिल्ह्यात माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथे देशातील एकमेव भगवान पुरुषोत्तमाचे मंदिर गोदावरी नदीच्या काठावर राजा रामदेवराय यांनी बांधले होते.भगवान पुरुषोत्तमाची अधिकमासा निमित्त महिनाभर जत्रा भरत असते.या दरम्यान, भगवान पुरुषोत्तमाच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक पुरुषोत्तमपुरी येत असतात.
या मंदिराची होणारी पडझड लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाकडे याबाबत तक्रार केली होती.जुन्या मंदिरामुळे भाविकांनाही मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत होता. भक्तांची गैरसोई लक्षात येताच महाराष्ट्र शासनाच्यावतीने मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी 54 कोटी 56 लाखांचा निधी मंजूर केला आहे.विभागीय आयुक्त सुनिल केंन्द्रेकर यांच्या प्रयत्नाने हा निधी मिळाला आहे.टेंडर प्रक्रियेनंतर या मंदिराच्या कामाला सुरुवात झाली आहे.जुलै महिन्यात अधिकमास सुरु होणार असल्याने मंदिरातील भगवान पुरुषोत्तमाची मूर्ती जुन्या मंदिरातून हालवून दुसरीकडे ठेवण्यात आली आहे.
दरम्यान,या मंदिरासमोर असलेली पिंड हलवताच त्याखाली सोन्याचे कासव सापडले.ही माहिती मिळताच गावकऱ्यांसह भाविकांनी सोन्याचे कासव पाहण्यासाठी मोठी गर्दी केली आहे.महादेवाची पिंड हलवताच त्याखाली असलेल्या खोलगट जागेत हे कासव ठेवण्यात आले होते.
(टीप : ही माहिती विविध माध्यमे तसेच विविध लेखामधून गोळा करून तुमच्यासाठी आणली गेली आहे.आमचा हेतू फक्त माहिती पोहोचवणे आहे)









































































