Last Updated on 08 Mar 2025 9:10 PM by Sanjay Patil/Adhorekhit
विद्यार्थ्यांनी संभ्रम न बाळगण्याचे महाज्योतीचे आवाहन
हिंगोली : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दि. 25 जुलै, 2024 च्या शासन निर्णयान्वये शासनाने पात्र विद्यार्थ्यांना 50 टक्के दराने अधिछात्रवृत्ती देण्यास मान्यता प्रदान केलेली होती. तदनंतर इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या दि. 11 ऑक्टोबर, 2024 च्या शासन निर्णयान्वये पीएच.डी. अधिछात्रवृत्ती-2023 मधील पात्र संशोधक विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून 100 टक्के दराने सरसकट अधिछात्रवृत्ती मंजूर करण्यास सुधारित मान्यता देण्यात आलेली आहे.
या निर्णयानुसार पात्र संशोधक विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून 100 टक्के दराने सरसकट अधिछात्रवृत्ती अदा करण्याकरिता अंदाजित एकूण 126.14 कोटी निधी लागणार आहे. ही बाब नव्याने उद्भवलेली असल्याने व मंजूर कृती आराखड्याच्या बाहेरील असल्याने महाज्योती कार्यालयाने निधीची मागणी ही पूरक मागणीद्वारे शासनाकडे केलेली आहे.
हा निधी उपलब्ध झाल्यानंतर थकबाकीची रक्कम अदा करण्याबाबत नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल. तसेच योजनेकरिता शासनाने पात्र ठरवलेल्या उपरोक्त शासन निर्णयाच्या दिनांकापासून म्हणजेच दि. 25 जुलै 2024 ते दि.31 डिसेंबर 2024 या कालावधीतील रक्कम अदा करण्याबाबत नियमानुसार कार्यवाही करण्यात येत आहे. महाज्योती संस्थेने उपलब्ध निधीतून आतापर्यंत दि. 25 जुलै 2024 ते दि.31 डिसेंबर 2024 या कालावधीतील संशोधन अहवाल सादर केलेल्या 414 विद्यार्थ्यांना 9 कोटी 33 लक्ष रुपये इतका निधी विद्यार्थ्यांना वितरीत केलेला आहे.
या अनुषंगाने उर्वरीत विद्यार्थ्यांकडून देखील संशोधन प्रगती अहवाल मागविण्यात आलेले असून प्राप्त होताच तपासून अधिछात्रवृत्तीची रक्कम अदा करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे, त्यामुळे निधी वितरणाबाबत विद्यार्थ्यांनी संभ्रम बाळगू नये, असे आवाहन महाज्योती मार्फत करण्यात आले आहे.










































































