Last Updated on 15 Sep 2023 8:16 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मराठा समाजाच्या प्रगतीची ‘सारथी’!
![]()
मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी स्थापन छत्रपती शाहू महाराज संशोधन,प्रशिक्षण व मानव विकास संस्था,पुणे अर्थात ‘सारथी’ ही खऱ्या अर्थाने प्रगतीची सारथी बनली आहे.स्पर्धा परीक्षांची तयारी,उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती,परदेश शिक्षणासाठी शिष्यवृत्ती,संशोधनासाठी अधिछात्रवृत्ती,कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम आदी अनेक उपक्रमांच्या माध्यमातून मराठा समाजातील विद्यार्थी,युवकांच्या शैक्षणिक,सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी संस्थेकडून प्रयत्न सुरू आहेत.
‘सारथी’ ही महाराष्ट्र शासनाची नियोजन विभागाच्या अधिपत्याखालील २५ जून, २०१८ रोजी कंपनी कायदा २०१३ च्या कलम ८ अन्वये स्थापन करण्यात आलेली ‘नॉन-प्रॉफिट’ कंपनी तसेच स्वायत्त संस्था आहे.राज्यातील मराठा, कुणबी,मराठा-कुणबी व कुणबी -मराठा या लक्षित गटातील समाजाच्या सामाजिक,आर्थिक व शैक्षणिक विकासाकरिता या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे.सारथीच्या माध्यमातून राज्यातील मराठा समाजाच्या आर्थिक,शैक्षणिक आणि सामाजिक प्रगतीसाठी विविध कल्याणकारी उपक्रम,योजना व्यापक स्वरुपात राबवण्यात येत आहेत.
1 लाख ३३ हजारावर विद्यार्थ्यांना लाभ
राज्यातील 1 लाख 33 हजार 236 विद्यार्थ्यांनी या संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेतला आहे.पीएच.डी विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती विभागात 2 हजार 109 विद्यार्थ्यांनी लाभ घेतला असून स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण विभागात 25 हजार 107 तर शिक्षण विभागांतर्गतच्या योजनांचा 25 हजार 137 विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आहे. तर कौशल्य विकास प्रशिक्षण विभागांतर्गत 20 हजार 743 लाभार्थ्यांना तर सारथीच्या इतर उपक्रमातंर्गत 60 हजार 140 जणांना फायदा झालेला आहे.
भरीव निधीचा पाठींबा
शासनाकडून या संस्थेस भरीव निधी प्राप्त होत असून सन 2023-24 या आर्थिक वर्षात 300 कोटी रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.या संस्थेचे मुख्यालय पुणे येथे असून उपकेंद्र कोल्हापूर येथे कार्यरत आहे.त्यासोबतच सारथीचे राज्यात 8 विभागीय कार्यालये कोल्हापूर, खारघर नवी मुंबई,पुणे,नाशिक, औरंगाबाद,लातूर,अमरावती व नागपूर या ठिकाणी कार्यरत आहेत.पुणे येथील मुख्यालयाच्या बांधकामासाठी राज्य शासनाने 42 कोटी रुपये अनुदान उपलब्ध करुन दिले असून बांधकाम गतीने सुरू आहे. शासनाने सात विभागीय कार्यालयांसाठी 1 हजार 15 कोटी रुपये रकमेस प्रशासकीय मान्यता दिली आहे.
छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना
छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना 2022-23 मध्ये एकूण 31 कोटी 23 लाख रुपये वाटप करण्यात आले आहे.यासाठी इयत्ता 9 वी व 11 वी मध्ये पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण,दहावी मध्ये 60 टक्के गुण मिळणे आवश्यक आहे.सारथी संस्थेने वरील अटीसह उत्तीर्ण झालेल्या व केंद्राच्या कोट्यामुळे शिष्यवृत्ती अप्राप्त असणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा 800 रूपये प्रमाणे वार्षिक 9 हजार 600 रुपये प्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात येते.
हेही वाचा – सारथी शैक्षणिक शिष्यवृत्ती; असा करा अर्ज!
महाराणी ताराराणी स्पर्धा परीक्षा विभाग
या उपक्रमातंर्गत सारथीमार्फत केंद्रीय लोकसेवा आयोग,महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांच्या पूर्व,मुख्य तसेच मुलाखत या तीन्ही टप्प्यांवर विद्यार्थ्यांना तयारीसाठी प्रशिक्षण सहाय्य करण्यात येते. यासाठी महाराणी ताराराणी स्पर्धा परीक्षा विभाग सक्रियरित्या कृतीशील असून या उपक्रमांतर्गत युपीएससीच्या पूर्व परीक्षेसाठी पाचशे विद्यार्थी दरवर्षी निवडण्यात येतात. नवी दिल्ली येथील प्रशिक्षणासाठी विद्यार्थांना दरमहा 13 हजार रुपये व पुणे येथील विद्यार्थ्यांना दरमहा ९ हजार रुपये विद्यावेतन दिले जाते. तसेच प्रशिक्षण संस्थेचे शुल्क सारथीमार्फत भरण्यात येते.
आत्तापर्यंत मागील तीन वर्षांत 1 हजार 479 विद्यार्थ्यांना पूर्व परीक्षेसाठी 21 कोटी रुपयांचा लाभ डीबीटीद्वारे देण्यात आला आहे.युपीएससी मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना 50 हजार रुपये एकरकमी दिले जातात.सारथी मुख्यालयातून विद्यार्थ्यांना झूम मिटींगद्वारे मार्गदर्शनही करण्यात येते. त्यांच्या अडचणी,समस्या सोडवण्यात येतात.आत्तापर्यंत मागील तीन वर्षांत साडेसहाशे विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी 3 कोटी 25 लाख रुपयांचा लाभ डीबीटीद्वारे देण्यात आला आहे.तर मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना पंचवीस हजार रुपये एकरकमी दिले जातात.मागील तीन वर्षात 206 विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी 51 लाख रुपयांचा लाभ देण्यात आला आहे.
युपीएससी परीक्षांमध्ये सारथीच्या माध्यमातून विद्यार्थी उत्तम यश प्राप्त करत असून आयएएस सेवेत तीन वर्षात 12,आयपीएस मध्ये 18 तर आयआरएस सेवेत 8, आयएफएस 1 आणि इतर केंद्रीय सेवांमध्ये एकूण 12 अशा सारथीमधील 51 विद्यार्थ्यांची युपीएससीमार्फत निवड झालेली आहे.भारतीय वन सेवेसाठी सारथी संस्थेतील दोन विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.तसेच युपीएससी केंद्रीय सशस्त्र पोलीस बल सेवेसाठी संस्थेतील पाच विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
राज्यसेवा प्रशिक्षण मार्गदर्शन
युपीएससी प्रमाणेच राज्य सेवा परीक्षा अर्थात एमपीएससीमध्येही सारथीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, प्रशिक्षण सेवा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. एमपीएससी प्रशिक्षणासाठी साडेसातशे विद्यार्थ्यांची निवड दरवर्षी करण्यात येते. यासाठी पुणे येथील विद्यार्थ्यांना दरमहा आठ हजार विद्यावेतन दिले जाते. प्रशिक्षण संस्थेचे शुल्क सारथीमार्फत भरण्यात येते.
मागील तीन वर्षांत 1 हजार 125 विद्यार्थ्यांना पूर्व परीक्षेसाठी 8 कोटी 26 लाख रुपयांचा लाभ डीबीटीद्वारे देण्यात आला आहे.मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना 15 हजार रुपये एकरकमी दिले जातात. तीन वर्षात 7 हजार 367 विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी अकरा कोटी रुपयांचा लाभ डीबीटीद्वारे देण्यात आला आहे.तसेच मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना एकरकमी 10 हजार रुपये दिले जातात. त्यासोबतच विद्यार्थ्यांना सारथीच्या मुख्यालयातून झूम मिटींगद्वारे तसेच अभिरुप मुलाखतीद्वारेही मार्गदर्शन केले जाते.मुलाखतीची सर्व तयारी करुन घेण्यात येते.
मागील तीन वर्षांत 566 विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी 56 लाख 60 हजार रुपयांचा लाभ डीबीटीद्वारे देण्यात आला आहे.सारथीच्या मार्गदर्शातून सन 2921 पासून वर्ग एक श्रेणीमध्ये 74 तर वर्ग दोन श्रेणीत 230 अशा एकूण 304 विद्यार्थ्यांनी यश मिळवलेले आहे.
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, पुणे अर्थात ‘सारथी’ ही खऱ्या अर्थाने मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या प्रगतीची सारथी बनली आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी, उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, परदेश शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, संशोधनासाठी अधिछात्रवृत्ती, कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम आदी अनेक उपक्रमांच्या माध्यमातून मराठा समाजातील विद्यार्थी, युवकांच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी संस्थेकडून प्रयत्न सुरू आहेत. या संस्थेच्या योजनांचा आढावा आपण घेत आहोत.
उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती
डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती सन 2022-23 मध्ये तीनशे विद्यार्थी निवडीसाठीची जाहीरात जुलै 2022 मध्ये प्रसिद्ध करण्यात आली असून यामधील 153 पात्र विद्याथ्यांची यादी सारथीच्या संकेतस्थळावर एप्रिल 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
परदेश शिक्षणासाठी शिष्यवृत्ती
महाराजा सयाजीराव गायकवाड सारथी गुणवंत मुला मुलींना परदेश शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना या वर्षापासून सुरु करण्यात येत असून चार जुलै 2023 रोजी मंत्रीमंडळाने या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. यासाठीची जाहिरात ऑगस्ट 2023 मध्ये प्रसिद्ध करण्यात आली असून 75 अर्ज प्राप्त झाले आहेत.
छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती (सीएसएमएनआरएफ)
सारथी मार्फत लक्षित गटातील उच्च शिक्षित विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण विकसित करण्याच्या उद्दिष्टाने ही अधिछात्रवृत्ती देण्यात येत आहे. संशोधन पूर्ण होईपर्यंत परंतु कमाल पाच वर्षाच्या कालावधीकरिता संशोधन प्रगती अहवालाच्या आधारे प्रतिमाह 31 हजार रुपये अधिछात्रवृत्ती देण्यात येते.यामध्ये 2019 ते 2023 या कालावधीत एकूण 2 हजार 109 विद्यार्थांचा सहभाग आहे.
कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम 2022-23 मध्ये छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व विकास संगणक कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम(सीएसएमएस-दीप) राबवण्यात येतो. 1 फेब्रुवारी 2023 पासून प्रशिक्षणास सुरूवात करण्यात आली असून यामध्ये ऑनलाईन प्राप्त झालेल्या एकूण 36 हजार 525 अर्जांपैकी अंतिम छाननीतून सारथी संस्थेने मान्यता दिलेल्या अर्जांची संख्या 27 हजार 346 इतकी आहे.
शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम
सन 2022-23 पासून ही योजना सारथीतर्फे राबवण्यात येते. यामध्ये वार्षिक लाभार्थी संख्या 2 हजार 500 इतकी असून फलोत्पादन उत्पादन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण, कापणीनंतरचे प्रशिक्षण, यामध्ये सामान्य हरितगृह व्यवस्थापन, शेड नेट हाऊस व्यवस्थापन, वनस्पती प्रसार आणि भाजीपाला रोपवाटिका व्यवस्थापन याबाबत पाच दिवसाचे प्रशिक्षण दिले जाते. शेतकरी उत्पादन कंपनी प्रशिक्षण कार्यक्रम 2023-24 योजनेचा कार्यारंभ आदेश जानेवारी 2023 मध्ये देण्यात आला आहे. प्रवेशासाठी ऑनलाईन पोर्टल तयार करण्याचे कामकाज एमसीडीसी स्तरावर सुरु असून ऑक्टोबर 2023 पासून राज्यातील 26 ठिकाणी प्रशिक्षणाची सुरूवात करण्यात येईल.
सारथी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम
या कार्यक्रमांतर्गत 35 क्षेत्रांचा समावेश आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी मुंबई यांच्यामार्फत राजमाता जिजाऊ कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्याचे प्रयोजन आहे. सदर संस्थेमार्फत 20 हजार विद्यार्थ्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण सुरु करण्याच्या अनुषंगाने डिसेंबर 2022 रोजी सामंजस्य करार करुन कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाची माहिती देण्यासाठी सहाय्यक आयुक्त (कौशल्य विकास) यांना सूचित करण्यात आले असून विद्यार्थी नोंदणीही सुरू करण्यात आली आहे.
विभागाकडून राबविण्यात येणारे विविध प्रकल्प/योजना
यासोबतच कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम 2022-23 मध्ये सारथीमार्फत श्रीमंत मालोजीराजे – सारथी इंडो जर्मन टुल रूम प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येत आहे. यामध्ये औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर व नागपूर येथील प्रशिक्षण केंद्रांमधून डिसेंबर 2022 व 6 फेब्रुवारी 2023 पासून 466 उमेदवारांचे प्रशिक्षण सुरु झाले आहे. यापैकी 166 मुलांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून नोकरीसाठी त्यांच्या मुलाखती सुरु आहे. तसेच नवीन जाहीरातही 3 जुलै 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या कौशल्य विकास प्रशिक्षणामध्ये औद्योगिक तंत्रज्ञान क्षेत्रातील अद्ययावत, आधुनिक कौशल्य विद्यार्थ्यांना उपलब्ध करून उद्योगांना आवश्यक ‘रेडी टू वर्क’ मनुष्यबळ उपलब्ध करणे हे उद्देश आहेत. यामध्ये 24 वेगवेगळ्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे.तसेच इंडो जर्मन टूल रूम प्रशिक्षण संस्थेचे शुल्क सारथी संस्थेमार्फत अदा करण्यात येते.
अशा विविध पद्धतीने सारथी मार्फत मराठा समाजातील विद्यार्थ्यांसोबतच समाजातील सर्व घटकांच्या प्रगतीसाठी,आर्थिक सक्षमीकरणासाठी व्यापक स्वरुपात उपक्रम,योजना राबवण्यात येत आहे. सर्व घटकांचे कल्याण, सामाजिक न्यायाच्या तत्त्वाचा अंगीकार ही या योजनांची वैशिष्ट्ये होत.
साभार । जिल्हा माहिती कार्यालय,पुणे









































































