Last Updated on 13 Jan 2024 7:17 PM by Sanjay Patil/Adhorekhit
‘महाराष्ट्रातील पहिला पायलट प्रोजेक्ट’ अशी मंजूरी
सांगली । माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या प्रयत्नामुळे राज्याचे ऊर्जा मंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मरळनाथपूर या आपल्या गावाला 100 टक्के सौर उर्जेवर चालणारे गाव म्हणून ‘महाराष्ट्रातील पहिला पायलट प्रोजेक्ट’ अशी मंजूरी मिळाली आहे.
सदरच्या प्रकल्पामुळे गावातील सर्व घरे,ग्रामपंचायत ऑफिस,पाणीपुरवठा योजना, शाळा, अंगणवाडी, सार्वजनिक संस्था यांची ऊर्जेची 100 टक्के टक्के गरज भागणार असून हे गाव सौरऊर्जा स्वयंपूर्ण होणार आहे.संपूर्ण गावातील कुटुंबाना मोफत वीज मिळणार आहे.तसेच गावशिवारात ९६ विहिरी असून या ठिकाणी सोलर पंप बसवण्यात येणार आहेत.गावातील दिवाबत्ती,हातपंपही सौर उर्जेवर चालणार आहेत.
त्याबद्दल माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा काल मरळनाथपूर गावामध्ये भव्य सत्कार करण्यात आला.यावेळी सदर प्रकल्पास मंजुरी दिल्याबद्दल सदाभाऊ खोत यांनी राज्याचे कर्तबगार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गावाच्या वतीने आभार मानले.गावातील सर्व महिलांनी आपल्या आपल्या घरासमोर केलेले आमचे औक्षण पाहून मन भारावून गेल्याचे सदाभाऊ म्हणाले.
यावेळी डि.के पाटील,अमोल पाटील,सागर खोत, सरपंच संदीप खोत, जयकर कचरे, उपसरपंच राजू खोत, निलेश पाटील, शंकर खोत, ग्रामसेवक कुबेर कांबळे, दिनकर खोत व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.













































































