Last Updated on 28 Feb 2022 10:56 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई ।
मनुकुमार श्रीवास्तव यांची राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मावळते राज्याचे मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती आज निवृत्त होत आहेत.मनुकुमार श्रीवास्तव हे १९८६ च्या बॅचचे सनदी अधिकारी आहेत. सध्या महाराष्ट्राच्या कॅडरमध्ये सर्वात जेष्ठ आणि अनुभवी अशा मनुकुमार श्रीवास्तव यांच्यावर नावावर केंद्राकडून शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
येत्या एप्रिल २०२३ पर्यंत मनुकुमार श्रीवास्तव यांच्याकडे मुख्य सचिव पदाचा भार असणार आहे. मनुकुमार श्रीवास्तव यांनी राज्याचे मावळते मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांच्याकडून मुख्य सचिव पदाचा पदभार हाती घेतला.या पदासाठी अतिरिक्त मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव (गृह), सुजाता सौनिक (सेवा), मनोज सौनिक (अर्थ) आणि नितीन करीर (महसूल) हे चार जण शर्यतीत आहेत. अखेर मनुकुमार श्रीवास्तव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.
मनुकुमार श्रीवास्तव हे सनदी अधिकाऱ्यांमध्ये सेवा जेष्ठतेनुसार आणि अनुभवानुसार सर्वात वरिष्ठ अधिकारी आहेत. श्री. श्रीवास्तव यांनी धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, कोल्हापूर जिल्हाधिकारी, नागपूर जिल्हाधिकारी, नागपूर महानगरपालिका आयुक्त, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव, महसूल आणि वन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अशा विविध पदांवर काम केले आहे. त्यांच्या मोठ्या अनुभवानंतरच त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्यांच्याकडे आगामी सव्वा वर्षे राज्याच्या मुख्य सचिव पदाची सूत्रे असतील.
श्री.मनु कुमार श्रीवास्तव यांचा जन्म १५ एप्रिल १९६३ रोजी झाला आहे. मूळचे लखनौ येथील श्री. श्रीवास्तव १९८६ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू झाले. त्यांनी भौतिक शास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे.
यावेळी अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा, अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर, आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप कुमार व्यास, ग्राम विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार, परिवहन विभागाचे प्रधान सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव विकास खारगे, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, वित्त विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे यांनी मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांचे अभिनंदन केले.










































































