Last Updated on 07 Jan 2022 10:48 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली ।
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत एक चांगली बातमी समोर आली आहे. देशाने कोरोना लसीकरणाचा आणखी एक मोठा टप्पा गाठला आहे.शुक्रवारी देशात लसीचे 150 कोटी डोस पूर्ण झाले आहे.आज दुपारी 2.20 वाजेपर्यंत देशात 1,50,17,23,911 डोस देण्यात आले होते.लसींच्या 150 कोटी मात्रा देण्याचा महत्वाचा टप्पा पार केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशबांधवांचे अभिनंदन केले आहे. देशाची लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी, जे अहोरात्र परिश्रम करत आहेत, अशा सर्वांचे पंतप्रधानांनी आभार मानले आहेत.
यासंदर्भात केलेल्या ट्वीट्स द्वारे पंतप्रधानांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
“देशाच्या लसीकरण मोहिमेतील अत्यंत महत्वाचा दिवस! 150 कोटी लसींचा टप्पा पार केल्याबद्दल सर्व देशबांधवांचे अभिनंदन ! आपल्या लसीकरण मोहिमेमुळे, अनेक जीव वाचले आहेत. त्याचवेळी, आपल्याला अजून कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करायचे आहे, हे ही लक्षात घ्यावे.
ही लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी जे अहोरात्र परिश्रम करत आहेत अशा सर्व लोकांचा भारत ऋणी आहे. आम्ही आपल्या डॉक्टरांचे, वैज्ञानिकांचे, संशोधकांचे आणि लोकांना लस देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभारी आहोत. माझी सर्व पात्र लोकांना विनंती आहे, की त्यांनी लवकरात लवकर लस घ्यावी. आपण सगळे एकत्रितपणे कोविड-19 विरुद्ध लढा देऊया. “
गेल्या वर्षी 16 जानेवारीपासून देशात लसीकरण मोहीम सुरू झाली होती. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये सरकारने डिसेंबरपर्यंत 216 कोटी लसीचे डोस देण्याचे लक्ष्य ठेवले होते. निर्धारित केलेल्या वेळेत देशात आतापर्यंत केवळ 150 कोटी डोस पूर्ण झाले आहेत. सुरुवातीचे 200 दशलक्ष लसीचे डोस 131 दिवसांत दिले गेले. पुढील 20 कोटी डोस 52 दिवसांत देण्यात आले. यानंतर 40 ते 60 कोटी डोस देण्यासाठी केवळ 39 दिवस लागले.













































































