Last Updated on 18 Dec 2025 3:40 PM by Sanjay Patil/Adhorekhit
ईश्वरपूर । भविष्यात शेतीत तंत्रज्ञानाचा वापर अनिवार्य ठरणार असून, परंपरागत पद्धतींपेक्षा आधुनिक आणि वैज्ञानिक शेतीकडे वळल्यास अधिकाधिक उत्पादनवाढ शक्य आहे, असे प्रतिपादन य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी केले. शासनाच्या योजनांतून उपसा जलसिंचन योजना अधिक मजबूत करणार असल्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
रेठरे हरणाक्ष (ता. वाळवा) येथे आयोजित शेतकरी संवाद मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कृष्णा सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन दामाजी मोरे होते.
कारखान्याचे व्हाईस चेअरमन जगदीश जगताप, संचालक लिंबाजी पाटील, संजय पाटील, शिवाजी पाटील, अविनाश खरात, जितेंद्र पाटील, दीपक पाटील, जे. डी. मोरे, बाबासाहेब शिंदे, धोंडीराम जाधव, बाजीराव निकम, निवासराव थोरात, वसंतराव शिंदे, श्रीरंग देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.
चेअरमन डॉ. भोसले यांनी शेतकरी, सहकार आणि साखर उद्योगाची सद्यस्थिती व भविष्यातील आव्हानांवर सविस्तर भूमिका मांडली. रेठरे हरणाक्ष गावाचा आणि परिसराचा कृष्णा कारखान्याच्या जडणघडणीत मोठा वाटा असल्याचे नमूद करत, येथून मोठ्या प्रमाणावर ऊस कारखान्याला मिळतो आणि या योगदानाबद्दल त्यांनी शेतकऱ्यांचे विशेष आभार मानले.
डॉ. भोसले म्हणाले, की साखरेचा बाजारभाव वाढला तरच शेतकऱ्यांना चार पैसे जास्त मिळू शकतात. पण सध्या शेतीतील खर्च वाढत असताना साखरेचा दर त्या प्रमाणात वाढत नसल्याने साखर उद्योगाला अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीतही शेतकरी हित डोळ्यांसमोर ठेवून झटणाऱ्या कारखान्यांपैकी कृष्णा कारखाना एक आहे. लहान शेतकरीही योग्य मार्गदर्शन आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने सरासरी १०० टनांपर्यंत ऊस उत्पादन घेऊ शकतो. यासाठी कारखाना पूर्ण सहकार्य करायला तयार आहे. भविष्यात शेतीत तंत्रज्ञानाचा वापर अनिवार्य ठरणार असून, आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य सल्ला देऊन उत्पादन वाढीसाठी मार्गदर्शन करता येईल.
कृष्णा कारखान्याने नवीन तंत्रज्ञान स्वीकारून कारखान्याची तांत्रिक क्षमता वाढवली असून, विस्तारीकरण करूनही ऊस दराबाबत कधीही तडजोड केली नाही. कारखान्याने शेतकऱ्यांना नेहमीच चांगला दर देण्याचा प्रयत्न केला आहे. आज अनेक सहकारी साखर कारखाने, सहकारी बँका आणि सूतगिरण्या बंद पडत असताना कृष्णा कारखाना मात्र प्रगती करत आहे. सहकारात दक्ष राहून, प्रामाणिकपणे काम केल्यामुळेच हे यश मिळाले असल्याचे त्यांनी नमूद केले.
ऊसाला विक्रमी दर दिल्याबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सत्कार
दरम्यान, ऊसाला विक्रमी दर दिल्याबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला कर्मवीर भाऊराव पाटील साखर कारखान्याचे संचालक संपत मोरे, मनोज पाटील, वैभव जाखले, सुजित मोरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वाळवा तालुकाध्यक्ष जगन्नाथ भोसले, गणपती शिंदे, दत्तात्रय निकम, दिलीप मोरे, डॉ. निवासराव पवार, रघुनाथ मोहिते, शिवाजीराव मोरे, पंडित संकपाळ, प्रवीण पाटील, प्रताप पाटील, सचिन पाटील यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कृष्णा कारखान्याचे संचालक जे. डी. मोरे यांनी प्रास्तविक केले. रामभाऊ सातपुते यांनी सूत्रसंचालन केले. धैर्यशील मोरे यांनी आभार मानले.
उपसा जलसिंचन योजना मजबूत करणार
शासनाच्या योजनांतून उपसा जलसिंचन योजना अधिक मजबूत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच पाणंद रस्त्यांसाठीदेखील शासनाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी दिली.










































































