Last Updated on 12 Mar 2024 5:48 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । बालशिक्षणात वेगवेगळ्या जागतिक संकल्पना उपलब्ध करून देणाऱ्या इस्लामपुरातील मुक्तांगण प्ले स्कूल मध्ये बोलक्या झाडाच्या माध्यमातून ज्ञान आणि मनोरंजनावर आधारित आनंदायी शिक्षण प्रणालीचा उपक्रम सुरू केला आहे.आर्टिफिशल इंटेलिजन्सचा वापर करून ‘टॉकिंग ट्री’ ही संकल्पना महाराष्ट्रात सर्वप्रथम उपलब्ध केली आहे.यामुळे बालशिक्षण आणखी आनंददायी होणार आहे.
इस्लामपूर शहरात सहा वर्षाच्या आतील मुलांसाठी खेळातून आणि अनुभवातून शिक्षण देण्यासाठी ‘मुक्तांगण’ गेली १४ वर्षे कार्यरत आहे. जगभरातील आनंददायी शिक्षणाची संकल्पना डोळ्यासमोर ठेवून सतत नवनवे प्रयोग मुक्तांगण मध्ये केले जातात.
बालशिक्षणातील नवा मार्ग म्हणून आता टॉकिंग ट्री लक्षवेधी ठरत आहे. मुक्तांगणच्या चिमुकल्यांना हे बोलके झाड आकर्षित करत आहे. नवनव्या गोष्टी, भाषा, गणिती संकल्पना, विविध आकार, रंगसंगती, भाषिक उच्चार त्यातून विविध प्रकारचा अभ्यासक्रम सहज पूर्ण केला जाणार आहे. मोठ्या स्क्रीनवर विविध अँपच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या टॉकिंग ट्रीची उंची आठ ते दहा फुटापर्यंत आहे. झाडाचे खोड ओरिजिनल असल्याने झाड हुबेहूब वाटते. त्याची पाने व फळे कृत्रिम आहेत. खोडाला चेहऱ्याचा आकार लावण्यात आला असून तो हालता आहे. संवाद साधताना चेहऱ्यावर विविध हालचाली होत असल्याने झाडाचा जिवंतपणा लहान मुलांना भावतो.
झाड बोलताना ओठांची हालचाल,डोळे, भुवयांच्या योग्य हालचाली लक्षवेधी ठरत आहेत. यामुळे मुलांच्या कल्पनाशक्तीचा विकास होतोय. वेगवेगळ्या भाव-भावनांचा अनुभव मुलांना समजल्याने एखादा विषय सहज लक्षात येतो.”
याबाबत माहिती देताना मुक्तांगणच्या संचालिका वर्षाराणी मोहिते म्हणाल्या,मुलांमधील निरीक्षण शक्ती आणि प्रतिभाशक्ती जागृत करण्यासाठी बोलके झाड उपयुक्त आहे. बालशिक्षणाच्या प्रक्रियेत खेळत खेळत विविध विषयांची ओळख आणि कौशल्य विकासावर भर दिला गेला आहे. विविध संकल्पना गमतीशीर आहेत.शिक्षणाच्या दृश्य परिणामाची याला जोड दिली आहे.
मुलांमधील शोधकता आणि कल्पनाशक्ती विकसित करण्याचा प्रयत्न आहे. मुलांना प्रश्न विचारायला आवडतात. या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी या बोलक्या झाडांमध्ये अनेक काल्पनिक पात्र आहेत. विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांनाही याचा निश्चित फायदा होत आहे. बालशिक्षणातील विविध वयोगटातील मुलांच्या गरजेनुसार शिक्षणातील आवडीचा आशय शिक्षक स्वतःच्या कौशल्यावर तयार करू शकतो.परीक्षा,शैक्षणिक साधने, उत्तरे सहज देता येतील अशी रचना आहे.टॉकिंग ट्री म्हणजेचं बोलक्या झाडाच्या माध्यमातून प्ले ग्रुप ते युकेजी पर्यंतचा अभ्यासक्रम नव्या AI तंत्रज्ञानाने मुलांमध्ये रुजवणार आहोत.लहान मुलांच्या शिक्षणासाठी नवा प्रयोग बहुदा परदेशात होतोय. तो प्रयोग आमच्या उपक्रमशील शाळेत महाराष्ट्रात पहिल्यादा आणल्याचा आम्हाला खूप अभिमान आहे.
‘टॉकिंग ट्री’ पर्याय नव्हे तर निवड
टॉकिंग ट्री हा पर्याय नव्हे तर ती निवड आहे. मुलं स्वतःच्या ज्ञानाचे शिल्पकार बनू शकतात. मुलांनी काय आणि कसे शिकायचे याचा निर्णय मूल स्वतः घेऊ शकते. शिक्षकांच्या मार्गदर्शनाची गरज असेलच असे नाही. मुलांच्या कलानुसार शिक्षण हे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. हसत- खेळत मनोरंजनात्मक पद्धतीने काल्पनिक पण विद्यार्थीस्नेही आणि शिक्षकांबरोबर शिक्षण हे उद्दिष्ट आहे.महाराष्ट्रात सर्वप्रथम टॉकिंग ट्री नावाची नवी संकल्पना मुक्तांगण प्ले स्कूल मध्ये उपलब्ध केली आहे.
प्रा.विनोद मोहिते
सचिव,मुक्तांगण स्कूल इस्लामपूर.












































































