Last Updated on 19 May 2023 6:47 AM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । ताकारी – इस्लामपूर रस्त्यावर बोरगाव येथे तरुणांना गुरुवारी पहाटेच्या सुमारास रस्ता ओलांडताना बिबट्याचे दर्शन झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.परिसरात सोशल मीडियावर दिवसभर याचीच चर्चा सुरु आहे.
शिराळा येथील सुमित पाटील व गणेश जाधव हे दोघे युवक गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास चार/बाराच्या शिफ्टला सोनहिरा साखर कारखाना येथे कामावर जाताना त्यांना बोरगाव येथील वीज वितरण कार्यालयाजवळ बिबट्या रस्ता ओलांडताना दिसल्याची पोस्ट सध्या समाज माध्यमांमध्ये आहे.त्याचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.बोरगाव परिसरातील लोकानी सावधानता घ्यावी अशी विनंती करत हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.हा व्हिडीओ परिसरात चांगलाच व्हायरल होत आहे.
![]()
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला VIDEO
![]()
दरम्यान,गेल्या काही दिवसांत कधी बहेच्या शिवारात,तर कधी फार्णेवाडीच्या शिवारात,काहीवेळा खरातवाडी रस्त्यावर तर कधी फार्णेवाडी – बोरगाव रस्त्यावर तसेच कधी रात्री बाराच्या सुमारास एका बंगल्याच्या पोर्चमध्ये बिबट्या अन् दोन बछड्यांचे दर्शन यामुळे कृष्णाकाठ परिसर धास्तावला आहे.कृष्णाकाठावरील गावांमधील शिवारात बिबट्याच्या वावरामुळे लोक दहशतीखाली आहेत.वाळवा तालुक्यातील कृष्णाकाठावरील गावांत बिबट्याचा वावर लोकवस्ती ते अगदी घरांपर्यंत पोहचल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.

बिबट्याचा वावरामुळे लोकं शेतात जायला घाबरत आहेत.त्याचबरोबर शेतात कामाला जाणाऱ्या मजुरांनीही याची धास्ती घेतली आहे.कृष्णाकाठावरील बहे,हुबालवाडी,खरातवाडी,फार्णेवाडी आदी कृष्णा नदीकाठच्या शेत-शिवारात गेल्या सहा महिन्यात वरचेवर बिबट्याचे दर्शन होत आहे.त्यातच गुरुवारी पहाटे बिबट्याचे बोरगाव येथे रस्त्यावर दर्शन झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.मागील सहा महिन्यात बिबट्याने दोन शेतकऱ्यांवर हल्ल्याचा प्रयत्न केला होता.या परिसरात बिबटे व बछड्यांची संख्या नेमकी किती आहे हे सांगता येत नाही.पण,बिबट्यांच्या संख्येबाबत चर्चा मात्र वेगवेगळ्या सुरू आहेत.









































































