Last Updated on 13 Sep 2022 12:15 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । वाळवा तालुक्यातील बोरगाव येथे गुरुवंदना संगीत महोत्सव साजरा करण्यात आला.बाल विद्यार्थ्यांचे सामुहिक तबला वादन रसिकांचे लक्ष वेधून घेणारे ठरले.सहभागी गायकांनी गायलेल्या गाण्यांनी रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
श्री.सद्गुरू ब्रम्हानंद संगीत विद्यालय बोरगांव आयोजित रमेश वाडेकर आणि विनायक वाडेकर यांच्या संकल्पनेतून गुरुवंदना संगीत महोत्सव संपन्न झाला.महोत्सवाचे प्रमुख पाहूणे संगीत अलंकार पंडित लोहार उपस्थित होते.राजारामबापू बँकेचे संचालक माणिकराव पाटील हे अध्यक्षस्थानी होते.यावेळी बोरगांवातील सर्व सांप्रदायक आणि संगीत क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानीत करण्यात आले.
ब्रम्हानंद संगीत विद्यालयाचे निर्माते रमेश वाडेकर आणि तबला अलंकार विनायक वाडेकर यांना सर्व विद्यार्थ्यांनी सामुहिक गीताने गुरुवंदना केली.तसेच अनेक विद्यार्थ्यांनी अभंगवाणी सादर केली.सर्व बाल विद्यार्थ्यांचे सामुहिक तबला वादन रसिकांचे लक्ष वेधून घेणारे होते.त्यानंतर रमेश वाडेकर यांची अभंगवाणी सादर झाली.पंडित लोहार यांनी भजन सम्राट बाबूराव बोरगांवकर आणि दादोबा वाडेकर यांच्या समवेत घडलेल्या आठवणींना यावेळी उजाळा दिला.त्यांनी सादर केलेले रुपक तालातील ‘सर्वात्मका सर्वेश्वरा’ हे गीत सर्वांनाच मन मोहून टाकणारे ठरले.प्रास्ताविक मानसिंग शिंदे यांनी केले.तर आभार हणमंत मुळीक यांनी मानले.निवेदन ज्योतिष शास्त्री प्रभाकर जंगम यांनी केले.अनेक भावनिक आणि विनोदी चुटके सांगत त्यांनी रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
सर्व गायक,वादकांना देवानंद पाटील यांनी तालवाद्यांची सुरेख साथ केली.अमरसिंह माने,ज्ञानेश माने,ओंकार पाटील,सौरभ मोरे,विनायक लोहार,ऋतुराज देशमुख,निल मुळीक,श्रवण जाधव निरंजन वाडेकर यांनी सोलो वादन केले.यासाठी हार्मोनियमचे साथ रितेश कांबळे, शशिकांत पाटील यांनी केली.सर्जेराव पाटील,राजेंद्र वादवणे,अनिकेत सुतार,अनिल वादवणे,मानसिंग शिंदे,हनुमंत मुळीक, सुधीर पाटील आणि सुजित पाटील,मनवा विजय वाडेकर,रमेश वाडेकर यांनी गाणी गायली.









































































