Last Updated on 10 Jan 2025 9:04 PM by Sanjay Patil/Adhorekhit
उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेची प्रवेशपत्रे डाऊनलोड करताना अडचण आल्यास विभागीय मंडळाशी संपर्क साधा – सचिव देविदास कुसाळ
मुंबई | उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षा फेब्रुवारी – मार्च २०२५ साठी सर्व विभागीय मंडळातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात येत आहेत. सर्व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना ही प्रवेश पत्रे ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या या संकेतस्थळावर शुक्रवार दिनांक १० जानेवारी २०२५ रोजी ‘ऍडमिट कार्ड’ या लिंक द्वारे डाऊनलोड करण्याकरिता उपलब्ध होतील, असे राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी कळविले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या सर्व उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक / प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांना याबाबत सूचित करण्यात आले आहे. या संदर्भात काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत करण्यात आले आहे.
सर्व उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षेची प्रवेशपत्रे (Hall Ticket) ऑनलाईन (Online) पध्दतीने मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शुक्रवार दिनांक १० जानेवारी २०२५ रोजी Admit Card या link व्दारे download करण्याकरिता उपलब्ध होतील. या संदर्भात काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा, असे आवाहन पुणे राज्य मंडळाचे सचिव देविदास कुसाळ यांनी केले आहे. ऑनलाईन प्रवेशपत्रे (Hall Ticket) उपलब्ध करून घेण्याच्या अनुषंगाने पुढीलप्रमाणे सूचित करण्यात येते-
फेब्रुवारी-मार्च २०२५ साठी सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी इ.१२ वी परीक्षेची ऑनलाईन प्रवेशपत्रे प्रिंट करुन विद्यार्थ्यांना द्यावयाची आहेत.
प्रवेशपत्र (Hall Ticket) ऑनलाईन (Online) पध्दतीने प्रिंटींग करताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये. प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापक/प्राचार्य यांचा शिक्का उमटवून स्वाक्षरी करावी.
ज्या आवेदनपत्रांना “Paid” असे Status प्राप्त झालेले आहे त्यांचीच प्रवेशपत्रे “Paid Status Admit Card या पर्यायाव्दारे उपलब्ध होतील.
अतिविलंबाने आवेदनपत्रे भरलेल्या व Extra Seat No विभागीय मंडळामार्फत दिलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे “Extra Seat No Admit Card” या पर्यायाव्दारे उपलब्ध होतील.
Download केलेल्या प्रवेशपत्रामध्ये नाव/आईचे नाव जन्मतारीख अशा दुरूस्त्या असल्यास या दुरूस्त्या ऑनलाईन पध्दतीने करावयाच्या असून त्याकरीता Application Correction ही Link उपलब्ध करून देण्यात आलेली असून विहित दुरूस्ती शुल्क भरून दुरूस्त्या विभागीय मंडळाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात याव्यात व विभागीय मंडळाच्या मान्यतेनंतर “Correction Admit Card या Link व्दारे सुधारीत Admit Card उपलब्ध होतील. विषय/माध्यम बदल असल्यास प्रचलित पध्दतीनुसार विभागीय मंडळात प्रत्यक्ष संपर्क साधून योग्य त्या दुरुस्त्या करण्यात याव्यात.
ज्या आवेदनपत्रांना ‘Paid ” असे Status प्राप्त झालेले नाही अशा आवेदनपत्रांचे शुल्क प्राप्त झाल्यानंतर त्यांचे Status Update होवून “Late Paid Status Admit Card” या Option व्दारे त्यांची प्रवेशपत्रे उपलब्ध होतील.
फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्यांचा फोटो चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापक / प्राचार्य यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावयाची आहे.
प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास संबंधित उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी पुनःश्च प्रिंट काढून त्यावर लाल शाईने व्दितीय प्रत (Duplicate) असा शेरा देऊन विद्यार्थ्यांस प्रवेशपत्र द्यावयाचे आहे.
फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेसाठी प्रविष्ट झालेले सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक/ प्राचार्य, सर्व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालये यांनी उपरोक्त बाबींची नोंद घेऊन त्याप्रमाणे उचित कार्यवाही करावी, असे आवाहन कोल्हापूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव सुभाष चौगुले यांनी केले आहे.
Post Views: 521