Last Updated on 20 Jan 2024 8:57 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । अयोध्या येथे २२ जानेवारी रोजी होणाऱ्या श्रीरामांच्या मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याचे औचित्य साधून बहे येथील रामलिंग बेटावरही या दिवशी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.रामलिंग बेटावर विद्युत रोषणाईसह भगवे ध्वज,भगव्या पताका व झालर लावून वातावरण भगवेमय व भक्तीमय केले आहे.
बहे या गावाला येथील रामलिंग बेटामुळे प्राचीनतेबरोबरच धार्मिक महत्व प्राप्त झाले आहे.इस्लामपूरपासून १० कि.मी. व कृष्णा कारखान्यापासून सुमारे ७ कि. मी. अंतरावर कृष्णेच्या तीरावर हे वसलेले आहे.प्राचीन काळात ही भूमी दंडकारण्य म्हणून ओळखली जात होती.रामलिंग बेट हे गावाच्या पश्चिमेला कृष्णा नदीच्या पात्रात अंदाजे १ कि.मी. लांब व अर्धा कि.मी. रुंद असलेल्या खडकावर तयार झाले आहे.कृष्णेच्या पाण्यामुळे निसर्गाचं वरदान या गावाला लाभलेले आहे.
रामलिंग बेटावर सोमवारी दिवसभर विविध कार्यक्रम होणार आहेत.सकाळी ६ ते ८:३० यावेळेत महापूजा व अभिषेक होणार आहे.सकाळी ९ ते ११ या वेळेत रामरक्षा पठण व रामनाम जप,दुपारी १२ ते १२:२० महाआरती व पुष्पवृष्टी होणार आहे.दुपारी १२:३० ते १:३० गीत रामायण तसेच भावगीत व भक्तिगीतांचा कार्यक्रम होणार आहे.सकाळी ११ पासून महाप्रसादाचे आयोजन केले आहे.सायंकाळी ६:३० वाजता दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे.त्याचबरोबर अयोध्या येथे २२ जानेवारी रोजी होणाऱ्या श्रीरामांच्या मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याचे एलईडी स्क्रीनवर थेट प्रसारणही करण्यात येणार आहे.पंचक्रोशीतील सर्व समाजातील रामभक्त मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.मोठ्या भक्तीभावाने,धार्मिक वातावरणात,रामाच्या जय घोषात हे कार्यक्रम होणार आहेत.
दरम्यान,स्वच्छता मोहिम राबवण्यात आली.रामदुत फाऊंडेशन व सहकाऱ्यांच्या पुढाकाराने मोठ्या संख्येने युवक वर्ग व विद्यार्थी यांनी सहभाग घेऊन मंदिर परिसराची स्वच्छता केल्याने परिसराचा चेहरामोहरा पालटला आहे.
रामलिंग बेट परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.अतिशय आकर्षक पद्धतीने एलईडी दिव्यांच्या माळा वापरून रोषणाई केली आहे.रंगीबेरंगी विद्युत रोषणाईमुळे मंदिर परिसर उजळून निघाला आहे ज्यामुळे हे दृश्य पाहतांना विलोभनीय दिसत आहे.राम मंदिराबरोबरच बेटावरील इतर मंदिरांवरही विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.भाजपचे प्रदेश सदस्य प्रसाद पाटील,यदुराज थोरात,पांडुरंग शेवाळे,नारायण कुंभार,मानसिंग पाटील,संजय पाटील,चंद्रसेन पाटील,काशिनाथ हुबाले,विकास पाटील,भगवान यादव,संजय मुळीक,धनपाल थोरात शरद पवार,लखन कोकीळ,अधिक बडवे,मकरंद बडवे,उदय बडवे,हणमंत आवळेकर,केदारी पाटील आदी तसेच बहे ग्रामस्थ या सोहळ्याचे नियोजन करत आहेत.
असे असेल नियोजन…
सकाळी ६ ते ८:३० – महापूजा व अभिषेक
सकाळी ९ ते ११- रामरक्षा पठण व रामनाम जप
सकाळी ११ पासून – महाप्रसाद
दुपारी १२ ते १२:२० – महाआरती व पुष्पवृष्टी
दुपारी १२:३० ते १:३० – गीत रामायण
सायंकाळी ६:३० – दीपोत्सव







































































