Last Updated on 19 Mar 2025 4:51 PM by Sanjay Patil/Adhorekhit
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत घोषणा
सांगली : क्रांतिसिंह नाना पाटील यांचे बहे या जन्मगावी स्मारक उभारण्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केली. त्यासाठी लागणारी आर्थिक तरतुद करण्याचा निर्णय घेतला.
इंग्रजांच्या विरोधात सशस्त्र क्रांती करुन ब्रिटीश सरकारला पळता भुई थोडी करणारे क्रांतिसिंह नाना पाटील यांचे बहे येथे स्मारक व्हावे अशी गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी आहे. बहे ग्रामपंचायतीने यासाठी पुढाकार घेऊन स्मारकासाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेचे गणेश शेवाळे यांनी केली आहे. स्मारकासाठी शेवाळे यांनी गेली १० वर्षे झाले शासनस्तरावर पाठपुरावा सुरु ठेवला होता.
क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्म ३ ऑगस्ट १९०० रोजी बहे या त्यांच्या आजोळी झाला.येथील कै. भाऊ बाळा मुसळे (देशमुख) हे त्यांचे मामा. त्यांच्या घरीच नाना पाटील यांचा जन्म झाला. नाना पाटील यांचे मूळ गाव येडेमच्छिंद्र. तर कर्मभूमी संपूर्ण महाराष्ट्र होती. येथील बसस्थानक परिसरात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एक नाम फलक उभारला आहे. त्या चौकाला ‘क्रांतिसिंह नाना पाटील चौक’ असे नावही देण्यात आले आहे.
अर्थसंकल्प अधिवेशनात सोमवारी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांचे जन्मगावी स्मारक उभारण्याचा निर्णय घेऊन त्यासाठी लागणारी आर्थिक तरतुद करण्याचा निर्णय घेतला.या निर्णयाचे वाळवा तालुक्यासह सांगली जिल्ह्यातील जनतेने स्वागत केले आहे.













































































