Last Updated on 14 Feb 2022 8:26 AM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली ।
हस्तलिखित सातबारा प्रमाणे संगणकीकृत सातबारा दुरुस्त करणे कामी कलम १५५ खाली मोहीम राबविण्यात येत आहे तरी बहे येथील खातेदारांनी ज्यांच्या संगणकीकृत सातबारा मध्ये काही त्रुटी / दुरुस्ती असल्यास त्यांनी दिनांक २० फेब्रुवारीपर्यंत बहे तलाठी कार्यालयात अर्ज करावेत असे आवाहन गावकामगार तलाठी अविनाश पाटील यांनी केले आहे.
बहे येथील खातेदार / शेतकऱ्यांनी ७/१२ चुकाबाबत संबंधित तलाठी कार्यालयास अर्ज करण्याचा कालावधी २० फेब्रुवारी २०२२ पर्यंत असून प्राप्त अर्जांची माहिती तहसिल कार्यालय येथे एकत्रीकरण करण्याचा दिनांक २१ फेब्रुवारी २०२२ आहे.तसेच तहसिल कार्यालय येथे दि. २१ ते २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे.
संबंधित खातेदारांनी दि. २० फेब्रुवारी पर्यंत मोफत ७/१२ वाटपानंतर त्यांच्या ७/१२ उताऱ्यामध्ये काही त्रुटी असल्यास त्या दूर करण्यासाठी आवश्यक पुराव्यासह अर्ज सादर करावा.७/१२ दुरूस्ती अर्ज प्राप्त झाल्यानंतर संगणीकृत ७/१२ दुरूस्ती करण्यासाठी अर्ज करणे व त्याची जुन्या हस्तलिखीत अभिलेखावरून खात्री करणे ऑनलाईन प्रस्ताव सादर करणे इत्यादी कामे केली जाणार आहेत.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी,प्रांताधिकारी डॉ.संपत खिलारी,तहसीलदार प्रदीप उबाळे,मंडळ अधिकारी तानाजी यादव यांच्या मार्गदर्शनाखाली संगणकीकृत ७/१२ उतारा अचूक करण्यासाठी शिबीराचे आयोजन ही विशेष मोहिम सुरू आहे.या संधीचा शेतकरी,खातेदार,पक्षकार यांनी लाभ घ्यावा,असे आवाहन तलाठी अविनाश पाटील यांनी केले आहे.







































































