Last Updated on 30 Nov 2023 8:38 AM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । बहे (ता. वाळवा) येथील गावालगत असणाऱ्या डेस्कतच्या शेतात बुधवारी सायंकाळी ५ च्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाले.दोनच दिवसापूर्वी बोरगाव येथील फार्णे मळा परिसरातील बाराबिगा हद्दीत जयकर गायकवाड यांच्या शेतात बिबट्याचे दर्शन झाले होते.
बहे येथील गावालगत डेस्कतच्या शेतात काशिनाथ बाळासो हुबाले यांचे शेड आहे.सायंकाळी ५ च्या सुमारास संजय हुबाले व पत्नी सुरेखा हुबाले हेही त्या ठिकाणी होते.कोंबड्यांचा मोठा आवाज सुरु झाला.संजय हुबाले यांच्या पत्नी सुरेखा हुबाले यांनी बाहेर जाऊन बघितले असता त्यांना ऊसालगत बिबट्या बसलेला दिसला.शेडपासून अगदी शंभर फुटाच्या अंतरावर हा बिबट्या होता.
बिबट्याच्या भीतीने हुबाले पती-पत्नी शेडमध्ये गेले.संजय हुबाले यांनी मोबाईलवरून हा प्रकार त्यांचे बंधू काशिनाथ हुबाले यांना सांगितला.काशिनाथ हुबाले व काही युवक तेथे पोहचले.त्याआधी आरडाओरडा केल्याने बिबट्याने ऊसाच्या शेतात धूम ठोकली.युवकांनी बिबट्याचा शोध घेतला.पण तो तेथून निघून गेला होता.
दरम्यान,दोनच दिवसापूर्वी बोरगाव येथील फार्णे मळा परिसरातील बाराबिगा हद्दीत जयकर गायकवाड यांच्या शेतात बिबट्याचे दर्शन झाले होते.वाळवे तालुक्यातील बोरगाव येथील फार्णे मळा परिसरातील बाराबिगा हद्दीत जयकर गायकवाड यांच्या शेतात बिबट्याचे दर्शन झाले.येथील सचिन उत्तम शिंदे हे दुपारी शेतात पाणी पाजायला गेले असता कुत्री भुंकत होती.त्यांनी आजूबाजूला पाहिले असता झाडावर पूर्ण वाढ झालेला बिबट्या दिसला.
कृष्णाकाठावरील बहे,हुबालवाडी,खरातवाडी,फार्णेवाडी आदी कृष्णा नदीकाठच्या शेत-शिवारात गेल्या सहा महिन्यात वरचेवर बिबट्याचे दर्शन होत आहे.बहे,फार्णेवाडी परिसरात बिबटे व बछड्यांची संख्या नेमकी किती आहे हे सांगता येत नाही.बिबट्याने आपला नैसर्गिक अधिवास बदलून उसाच्या फडात राहणे सुरु केल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराहटीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा,अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.नाहीतर माणसाचा जीव गेल्यावर बंदोबस्त करून काही उपयोग नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.सध्या ऊस तोडी सुरु असल्याने बिबट्याची लपण्याची ठिकाणे बदलत आहेत.त्यामुळे या परिसरात बिबट्याची दहशत कायम आहे.












































































