Last Updated on 01 Oct 2023 7:22 AM by Sanjay Patil/Adhorekhit
बहे येथील शेतशिवारात बिबट्याची दहशत…बंदोबस्ताची मागणी
सांगली । बहे येथे शेतकऱ्याच्या दिशेने बिबट्याने येण्याचा प्रयत्न केला.पण,शेतकऱ्याने प्रसंगावधान राखल्याने ‘त्या’ बिबट्याने बछड्यासह उसाच्या फडात धूम ठोकली.हा प्रकार शनिवारी (30 सप्टेंबर) सकाळी घडला.दुसऱ्या एका घटनेत शुक्रवारी पहाटे मुसळे पाणंद परिसरात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात कुत्रा ठार झाला.दरम्यान,बहे परिसरात वरचेवर बिबट्याचे दर्शन होत या परिसरात बिबट्याची दहशत वाढू लागली आहे.
बहे (ता.वाळवा) येथील प्रमोद हणमंतराव सकटे हे शनिवारी सकाळी सहाच्या सुमारास शेतात वैरणीसाठी निघाले होते.त्यावेळी त्यांना खोल पाणंद परीसरातील शेतातील उसाच्या फडातून बिबट्या व सोबत बछडा दिसला.समोर बिबट्या दिसताच ते भयभीत झाले.पण,प्रसंगावधान राखत त्यांनी आरडा ओरडा केल्याने बिबट्या व बछड्याने तेथून धूम ठोकली.सकटे हे भीतीने शेतात न जाता परत घरी आले.त्यांनी घडला प्रसंग घरी येऊन सांगितला.
दुसऱ्या एका घटनेत बिबट्याने केलेल्या हल्ल्यात कुत्रा ठार झाला.येथील मुसळे पाणंद परिसरात सुरेश पाचुंब्रे यांचे शेत असून ते शेतातील वस्तीवर रात्री वस्तीला होते.शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज आला.भुंकण्याचा आवाजाने ते जागे झाले.बाहेर येऊन पाहतात तर कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केल्याचे त्यांना दिसले.त्यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने तेथून धूम ठोकली.पण,बिबट्याच्या या हल्ल्यात कुत्रा ठार झाला.
दरम्यान,बहे परिसरात बिबट्याचे शेतशिवारात वरचेवर दर्शन घडत आहे.कृष्णाकाठावरील बहे,हुबालवाडी,खरातवाडी,फार्णेवाडी आदी कृष्णा नदीकाठच्या शेत-शिवारात गेल्या सहा महिन्यात वरचेवर बिबट्याचे दर्शन होत आहे.बहे,फार्णेवाडी परिसरात बिबटे व बछड्यांची संख्या नेमकी किती आहे हे सांगता येत नाही.परिसरात वरचेवर बिबट्याचे दर्शन होत असल्याने शेतकरी व ग्रामस्थ दहशतीखाली आहेत.
बहे परिसरात बिबट्याचे वास्तव्य वाढू लागले आहे.त्यामुळे या परिसरातील ग्रामस्थांमध्ये दिवसेंदिवस भीतीचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे.कारण दिवसाढवळ्या बिबट्या या ठिकाणी नागरिकांना दर्शन देत असल्याचे पहायला मिळत आहे.बिबट्यांना जंगले कमी झाल्याने बिबट्या मानवी वस्तीकडे वाटचाल करू लागला आहे.त्यामुळे वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा,अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.नाहीतर माणसाचा जीव गेल्यावर बंदोबस्त करून काही उपयोग नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.










































































