Last Updated on 28 Jun 2025 10:06 PM by Sanjay Patil/Adhorekhit
बीड । माजी मंत्री आ. सदाभाऊ खोत यांनी नुकत्याच केलेल्या बीड दौऱ्यानंतर फेसबुकवर भावनिक पोस्ट शेअर केली असून ती सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. दौऱ्याच्या धावपळीत जेवणाला वेळ नसताना, कळंब तालुक्यातून आलेल्या एका कार्यकर्त्याने आपल्या घरून आणलेली ज्वारीची भाकरी, वांग्याचं भरलं, चटणी आणि आंब्याचं लोणचं ही त्यांच्यासाठी एक प्रेमळ शिदोरी ठरली.
बीड जिल्ह्यात दौरा करून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. दौऱ्याच्या धावपळीत जेवणासाठी वेळ मिळालाच नव्हता. पण माझा एक जिवाभावाचा कार्यकर्ता – विनोद,कळंब तालुक्यातून तब्बल 100 किलोमीटर दूरून फक्त भेटण्यासाठी बीडमध्ये आलेला होता. त्याने आपल्या घरातून साध्या फडक्यात बांधून आणलेली ज्वारीची भाकरी, वांग्याचं भरलं, चटणी आणि आंब्याचं लोणचं – याला खऱ्या अर्थाने ‘शिदोरी’ म्हणावं लागेल.
तो सारखा विचारत होता, “भाऊ, जेवण कधी करणार?”
त्याच्या डोळ्यांतली आपुलकी, काळजी आणि नातं – सगळं त्या एका प्रश्नामध्ये लपलेलं होतं.
गाडीत बसताना त्याने हातात ती पिशवी दिली. वेळ नव्हता, पण त्या भाकरीचं मोल वेळेपेक्षा मोठं होतं. आम्ही सोलापूर जवळ आल्यानंतर जेवायचा थोडा वेळ काढला. त्या फडक्यातली भाकरी जेव्हा तोंडात घातली, तेव्हा केवळ चव नव्हे तर आठवणी, आपुलकी, आणि गावगाड्याच्या मातीचा सुगंध तोंडात उतरला असं खोत यांनी नमूद केलं.
शाळेत जाताना बापाच्या धोतरात बांधलेलं भाकर फडके, गुरांमागं जाताना सोबत असलेली चटणी आणि लोणचं – या आठवणी नव्याने जिवंत झाल्या.
विनोदसारखे कार्यकर्ते पदाच्या अपेक्षेशिवाय कार्य करतात. वर्षानुवर्षं तळहाताच्या फोडाप्रमाणे संघटनेला जपतात. आणि त्यामुळंच, राजकारणात चाललेल्या पक्षांतरांच्या खेळामध्येही, आपल्याला अद्याप शुद्ध कार्याचं एक आश्वासन मिळतं – गावच्या मातीतून उगम पावलेल्या या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून.
ही भाकर फक्त पोटाची नव्हती, ती भावनिक नात्यांची शिदोरी होती.
त्यांनी कार्यकर्त्याच्या त्यागशीलतेचा उल्लेख करत, “पदाच्या अपेक्षेशिवाय संघटनेसाठी झटणारे कार्यकर्ते हीच खरी संपत्ती आहे,” असा सूर आपल्या लेखनातून उमटवला.
या पोस्टमधून सामान्य कार्यकर्ता आणि नेतृत्वातील नात्याचं संवेदनशील चित्र उभं राहिलं आहे.
बातमी स्त्रोत : फेसबुक पोस्ट, सदाभाऊ खोत अधिकृत पेज






































































