Last Updated on 18 Sep 2024 7:37 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । आपल्या महापुरुषांच्या विचाराने आपण वाटचाल करणे,सर्वांच्या हिताचे आहे. देशात सध्या जे घडत आहे,आपला देश कोणत्या राजकीय परिस्थितीतून वाटचाल करीत आहे,याकडे एक कार्यकर्ता म्हणून आपले बारीक लक्ष हवे. समाजात बदल घडवून आणायचा असेल,तर अगोदर एक कार्यकर्ता म्हणून आपल्यात बदल घडवून आणावा लागेल. त्यादृष्टीने कार्यकर्ता शिबिरास मोठे महत्व असल्याची भावना राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांनी इस्लामपूर येथील कार्यकर्ता शिबिराच्या उदघाटन समारंभात व्यक्त केली.
इस्लामपूर येथे दलित महासंघ (वायदंडे गट) यांच्या वतीने आयोजित एक दिवसीय कार्यकर्ता अभ्यास व प्रशिक्षण शिबिराचे उदघाटन श्री.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. राजारामबापू बँकेचे अध्यक्ष प्रा.शामराव पाटील अध्यक्षस्थानी होते. दलित महासंघाचे राज्याध्यक्ष डॉ. सुधाकर मधुकर वायदंडे,प्राचार्य राजेंद्र कुरळपकर,राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे राज्य सरचिटणीस अरुण कांबळे,प्रा.सचिन गरूड,दलित महासंघ युवक आघाडीचे राहुल मोरे,सुनील मोरे,शशिकांत नांगरे,सागर लोंढे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी उपप्राचार्य संदीप पाटील,प्रा.डॉ.सुरज चौगुले,राष्ट्रवादी असंघटीत कामगार संघटनेचे तालुकाध्यक्ष सागर चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राज्यघटनेच्या प्रस्तावनेची शपथ घेण्यात आली.
सुधाकर वायदंडे म्हणाले,जेष्ठ नेते खा. शरदचंद्र पवारसाहेब हे जातीयवाद्यांच्या विरोधात लढत आहेत. माजी मंत्री आ. जयंतराव पाटील यांनी पारधी समाजाचे प्रश्न सोडवले आहेत. काही जण ॲक्ट्रॉसिटीमध्ये सेटलमेंट करून,तसेच जयंतीच्या माध्यमातून पैसे उकळण्याचा उद्योग करीत आहेत. यातून दलित चळवळ बदनाम होत आहे.
प्रा.शामराव पाटील म्हणाले,राजकीय स्वार्थासाठी केंद्रीय संस्थांचा वापर करून विरोधकांना भीती दाखविणे लोकशाहीस मारक आहे. विरोधकांना आपल्याकडे वळवून सत्ता मिळविण्याचे घाणेरडे राजकारण सुरू आहे. बेकारी,महागाई हे प्रश्न सोडविण्यापेक्षा धार्मिकतेला प्रोत्साहन देत आहेत. चळवळीत कार्यकर्ता महत्वाचा घटक असून कार्यकर्त्यांनी सामान्य माणसांच्या प्रश्ना वर लढायला हवे.
प्राचार्य राजेंद्र कुरळपकर म्हणाले,आता आंधळे भक्त नको,तर प्रशिक्षित कार्यकर्ता हवा. सामाजिक,सांस्कृतिक,राजकीय क्षेत्रात अधोगती सुरू आहे. भारतीय राज्यघटनेचा अवमान करणाऱ्या घटना देशात घडत आहेत. नागरिक व कार्यकर्ता हा प्रशिक्षित हवा.
याप्रसंगी राज्य उपाध्यक्ष पोपटराव लोंढे, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष शशिकांत नांगरे, सदाभाऊ चांदणे,नागनाथ घाटगे,विजय तांदळे,संदीप गायकवाड,तेजस गायकवाड, सागर लोंढे,नारायण वायदंडे,राजेश वायदंडे, जगदीश वारे,योगेश वारे,राजेंद्र घस्ते,अमोल लोखंडे,अर्जुन वारे,प्रदीप लांडगे,आदित्य घस्ते,राजेंद्र चव्हाण,गुलाब सय्यद,त्रिशूल वायदंडे,सुनीता भालेराव,रोहित वायदंडे सचिन वायदंडे यांच्यासह सांगली,कोल्हापूर व राज्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.
शशिकांत नागरे (कामेरी) यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सदाभाऊ चांदणे यांनी आभार मानले.










































































