Last Updated on 04 Nov 2024 4:01 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची तात्काळ बदली करण्याचे आदेश दिले आहेत. काँग्रेस आणि इतर पक्षांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. रिक्त झालेल्या पोलीस महासंचालक पदाचा कार्यभार मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
काँग्रेस आणि इतर पक्षांकडून आलेल्या तक्रारींची दखल घेत निवडणूक आयोगानं महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची तातडीने बदली करण्याचे निर्देश मुख्य सचिवांना दिले आहेत. पदश्रेणीमधील त्यांच्या पाठोपाठ असलेल्या आयपीएस अधिकाऱ्याकडे त्यांचा पदभार सोपवण्यास सांगितलं आहे. त्याबरोबरच महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक म्हणून नियुक्त करण्यासाठी तीन आयपीएस अधिकाऱ्यांचं एक पॅनेल उद्यापर्यंत पाठवण्याचे निर्देशही आयोगानं दिले. निवडणूक आयोगाच्या निर्देशांनंतर मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांना महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी यापूर्वीच्या आढावा बैठकांदरम्यान आणि राज्यामध्ये विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना केवळ निष्पक्ष आणि न्याय्य भूमिका घेऊ नये तर कर्तव्य पालनादरम्यान त्यांच्या वर्तनात कोणताही भेदभाव असू नये असा इशारा देखील दिला होता.












































































