Last Updated on 04 Nov 2024 4:36 PM by Sanjay Patil/Adhorekhit
पुणे । उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी महाविकास आघाडीला पुणे शहरात बंडखोरी रोखण्यात अपयश आलं आहे. काँग्रेस नेते आणि माजी उपमहापौर आबा बागुल यांनी पर्वती विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून भरलेला अर्ज कायम ठेवला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रभारी शहराध्यक्ष अंकुश काकडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी खासदार वंदना चव्हाण यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बागुल यांची भेट घेऊन त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती केली होती. मात्र बागुल आपल्या उमेदवारीवर ठाम राहिले. आता पर्वतीमध्ये भाजपच्या माधुरी मिसाळ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अश्विनी कदम यांच्या विरुद्ध बागुल अशी तिरंगी लढत होणार आहे.
हेही वाचा – काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांची निवडणुकीतून माघार
कसबा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या माजी महापौर कमल व्यवहारे यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. मात्र काँग्रेस बंडखोर उमेदवार मुख्तार शेख यांची बंडखोरी शमवण्यात काँग्रेसला यश आलं आहे. उमेदवारी माघारी घेत पक्षाचे अधिकृत उमेदवार रविंद्र धंगेकर यांना मुख्तार यांनी पाठिंबा दिला आहे. काँग्रेसचे रवींद्र धंगेकर, भाजपाचे हेमंत रासने, मनसेचे गणेश भोकरे आणि कमल व्यवहारे अशी चौरंगी लढत कसब्यात पाहायला मिळणार आहे.
शिवाजीनगर मध्ये काँग्रेसचे मनीष आनंद यांनी अपक्ष म्हणून आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. काँग्रेसचे दत्ता बहिरट आणि भाजपचे सिद्धार्थ शिरोळे या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.











































































