Last Updated on 13 Mar 2024 6:54 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांनी आज सकाळी परिवहन (RTO) विभागाच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या १८७ इंटरसेप्टर वाहनांना हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी या इंटरसेप्टर वाहनांची पाहणी करुन त्यातील सुविधा आणि कार्यप्रणालीची माहिती घेतली.

अपघातमुक्त महाराष्ट्र करण्याची शासनाची पहिल्या दिवसापासून भावना आहे. त्यासाठी जिल्हा स्तरावरील समितीच्या माध्यमातून अपघातप्रवण जागा कमी करण्याबरोबरच स्पीड गन, कृत्रिम बुद्धिमत्ता या प्रगत तंत्रज्ञानाचा आधुनिक वाहतूक व्यवस्थापन प्रणालीमध्ये उपयोग करावा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना केले.
इंटरसेप्टर वाहनांमुळे रस्ता सुरक्षा अधिक सक्षम होणार असून अपघातमुक्त राज्य करण्यासाठी शासनाकडून विभागाला पूर्ण सहकार्य करण्यात येत आहे. रात्रीच्या वेळी होणारे अपघात टाळण्यासाठी प्रत्येक नाक्यांवर वाहन चालकांची तपासणी, त्यांच्यात जागृती, रस्त्यांवर रम्बलर अशा गोष्टींवर प्राधान्याने काम करुन अपघात नियंत्रणात आणण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.
अपघात कमी करून लोकांचे जीव वाचविले पाहिजे. एक जीव वाचला, तर एक कुटुंब वाचते हे लक्षात ठेवून अपघात नियंत्रणासाठी आवश्यक असलेल्या सर्व उपाययोजना राबविण्याचे निर्देशही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले.
नरिमन पॉईन्ट येथे आयोजित कार्यक्रमास शिक्षण मंत्री दीपक केसरकर, परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांचेसह प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.












































































