Last Updated on 04 Apr 2025 3:03 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । राज्यभरात परिवहन विभागाच्या जिथे, जिथे जमिनी आहेत, त्या बहुतेक जमिनीवर अतिक्रमण झाले आहे. ते अतिक्रमण काढून टाकून, तेथे कुंपण भिंत घालावी, तसेच नामफलक लावण्यात यावा. असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन विभागाला दिले आहेत. परिवहन विभागाच्या आढावा बैठकीमध्ये परिवहन मंत्री यांनी यावेळी माहिती दिली. यावेळी परिवहन आयुक्त विवेक भीमनवार व सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीमध्ये अधिकाऱ्यांच्या कार्याचे मूल्यमापन करणे, अकार्यकारी पदाची निर्मिती करणे, वायु वेग पथकाचा दैनंदिन अहवाल मागून घेणे, मोटार वाहन अधिकाऱ्यांच्या पदनामासह कर्तव्य व जबाबदारी निश्चित करणे, विधि व सल्लागार पदाची निर्मिती करणे, महसूल वाढवणे अशा विविध विषयावर चर्चा करण्यात आली.
सन २०२३ पासून परिवहन विभागाच्या विविध पदांच्या बदल्या या ऑनलाइन पद्धतीने होत आहेत. यामध्ये मानवी हस्तक्षेपाला कोणती संधी नाही. यापुढे देखील या ॲपमध्ये आवश्यक त्या सुधारणा करून होणाऱ्या बदल्या अत्यंत पारदर्शक होतील याबाबत दक्ष रहावे! तसेच अधिकाऱ्यांच्या बरोबरच लिपिक पदाच्या देखील बदल्या या ॲपद्वारे होतील असे निर्देश बैठकीत दिले .







































































