Last Updated on 14 Jan 2024 7:10 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 जानेवारी 2024 रोजी दुपारी 12 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून,प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान (पीएम जनमन) अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण (पीएमएवाय – जी) च्या 1 लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता जारी करतील.यावेळी पंतप्रधान पीएम-जनमन अभियानाच्या लाभार्थ्यांशी संवादही साधतील.
दुर्लक्षित घटकातील अगदी शेवटच्या व्यक्तीच्या सक्षमीकरणासाठी पंतप्रधानांच्या अंत्योदयाच्या दृष्टिकोनातून होत असलेल्या प्रयत्नांच्या अनुषंगाने,15 नोव्हेंबर 2023 रोजी आदिवासी गौरव दिनाच्या निमित्ताने,विशेषत: दुर्लक्षित आदिवासी समूहाच्या (पीव्हीटीजीएस) सामाजिक-आर्थिक कल्याणासाठी पीएम जनमन अभियान सुरू करण्यात आले.
सुमारे 24,000 कोटी रुपयांची पीएम जनमन योजना 9 मंत्रालयांच्या माध्यमातून 11 प्रमुख उपक्रमांवर लक्ष केंद्रित करते.विशेषत: दुर्लक्षित आदिवासी समूहातील (पीव्हीटीजीएस) कुटुंबे आणि लोकवस्त्यांना सुरक्षित घरे,शुद्ध पिण्याचे पाणी,स्वच्छता,शिक्षण,आरोग्य आणि पोषण,वीज,रस्ते आणि दूरसंचार यासारख्या मूलभूत सुविधा आणि शाश्वत उपजीविकेच्या संधी प्रदान करून या घटकांच्या सामाजिक-आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा घडवून आणणे हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे.











































































