Last Updated on 04 Jul 2025 6:50 PM by Sanjay Patil/Adhorekhit
शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांची विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात माहिती
मुंबई । शालेय शिक्षण विभागातील शिक्षण सेवा गट-अ व ब शिक्षण सक्षमीकरण शाखेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्यात आली आहे. मात्र विना अनुदानित/अंशतः अनुदानित पदावरील नियुक्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीत परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेसंदर्भातील निर्णय सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयानंतर याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
विधानपरिषद सदस्य विक्रम काळे यांनी याबाबतचा प्रश्न विचारला होता. सदस्य संजय खोडके, धीरज लिंगाडे, किरण सरनाईक यांनीही याबाबतचे उपप्रश्न विचारले.
यास उत्तर देताना राज्यमंत्री डॉ.भोयर म्हणाले की, जुनी पेन्शन योजनेचा निर्णय न्यायप्रविष्ट असून यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर हा प्रश्न आणि सदस्याच्या भावना कळविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
संच मान्यतेच्या शासन निर्णयामध्ये सुधारणेबाबत चर्चेसाठी लोकप्रतिनिधींसमवेत बैठक घेणार
मुंबई : शालेय शिक्षण विभागातील संच मान्यतेच्या निकषासंदर्भातील १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्याबाबत विविध माध्यमातून सूचना येत आहेत. त्यानुषंगाने सर्व संबंधित लोकप्रतिनिधी यांच्यासमवेत बैठक घेऊन सविस्तर चर्चा करण्यात येईल, असे शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी विधान परिषदेत सांगितले.
सदस्य अभिजीत वंजारी यांनी यासंदर्भातील प्रश्न विचारला होता. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री ज्ञानेश्वर म्हात्रे, किरण पावसकर, निरंजन डावखरे, जगन्नाथ अभ्यंकर, सुधाकर अडबाले, पंकज भुजबळ आदींनी सहभाग घेतला.
राज्यमंत्री डॉ.भोयर म्हणाले, संच मान्यता ही ऑनलाईन पद्धतीने केली जाते. तथापि त्यात दुरुस्तीसाठी पुण्याला जावे लागते. यासंदर्भातील मागणी लक्षात घेऊन ही प्रक्रिया विभागीय पातळीवर करण्याबाबत निश्चित विचार करण्यात येईल. त्याचप्रमाणे वेळ लागणाऱ्या कार्यप्रणालीऐवजी सुलभ कार्यप्रणाली स्वीकारण्यात येईल. मुंबई विभागातील समायोजन करण्यात आलेल्या शिक्षकांचे प्रलंबित असलेले पगार ते शिक्षक समायोजनाच्या ठिकाणी रुजू होताच करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
शालार्थ आयडी प्रक्रियेमध्ये गैरव्यवहार होत असल्याच्या प्रश्नाबाबत उत्तर देताना राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी याबाबत दोषींवर कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगून शालार्थ आयडी लवकर देण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती दिली.












































































