Last Updated on 29 Aug 2024 7:56 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली । केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयानं नोकरदार महिलांसाठी शी बॉक्स ही ऑनलाइन तक्रार व्यवस्थापन प्रणाली सुरु केली आहे. कार्यालयीन ठिकाणी महिलांना लैंगिक शोषणासारख्या घटनांचा सामना करावा लागल्यास त्याविरुध्द महिलांना या शी बॉक्समध्ये तक्रार करता येणार आहे. तक्रार निवारणाची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन असून त्यात पारदर्शकता केली जाणार आहे.केंद्र सरकारची सर्व मंत्रालयं आणि विभाग तसंच राज्य सरकारचीही सर्व कार्यालयं आणि संबंधित संस्थांच्या महिला कर्मचाऱ्यांना या प्रणालीचा उपयोग करता येणार आहे.
नवी दिल्ली इथे आज या नव्या संकेतस्थळाच्या लोकार्पणाचा कार्यक्रम झाला. यावेळी केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या हस्ते या संकेतस्थळाचा प्रारंभ झाला. महिला आणि बालविकास राज्यमंत्री सावित्री ठाकूर, महिला आणि बालविकास मंत्रालयाचे सचिव अनिल मलिक यांच्यासह मंत्रालयाचे अनेक अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
शी बॉक्स हे नवे वेब पोर्टल देशभरातील सर्व शासकीय तसेच खाजगी क्षेत्रातील आस्थापने आणि कार्यालयांमध्ये स्थापन केल्या गेलेल्या अंतर्गत समित्या (IC) आणि स्थानिक समित्यांशी (LC) संबंधित माहितीसाठाचे केंद्रीकृत भांडार म्हणून कार्यरत असेल. तक्रार दाखल करणे तसेच तक्रारीच्या स्थितीगतीविषयी माहिती मिळवण्यासाठी एकच व्यासपीठ म्हणून हे वेब पोर्टल उपयुक्त ठरणार आहे. यासोबतच अंतर्गत समित्यांद्वारा कालबद्ध स्वरुपात प्रक्रिया पार पाडली जाईल याची सुनिश्चिती करण्यातही या वेब पोर्टलची मदत होणार आहे. हे वेब पोर्टल प्रत्येक संबंधीताला तक्रारीचे निवारण होण्याची तसेच सुव्यवस्थित प्रक्रियेची हमी देते. हे पोर्टल समर्पित समन्वयक अधिकाऱ्याच्या माध्यमातून तक्रारींसंबधी प्रक्रियेवर देखरेख ठेवणार आहे.












































































