Last Updated on 05 Aug 2023 6:51 PM by Sanjay Patil/Adhorekhit
चालण्यासारखा दुसरा उत्तम व्यायाम नाही.चालणे ही सुदृढ शरीराची गुरूकिल्ली आहे.ही वाक्ये अगदी माध्यमिक शाळेतल्या शारीरिक शिक्षणाच्या तासापासून कानावर पडलेली असतात.त्यामुळे इतर कुठला व्यायाम केला नाही तरी चालेल.पण दिवसातून काही वेळ तरी चालायला हवं,हे प्रत्येकालाच माहिती असते.
मानसिक आणि शारीरिक आरोग्य जपण्यासाठी जास्तीत जास्त चालणं फायदेशीर असते.यामुळे मूडही चांगला राहतो आणि शारीरिक ऊर्जा वाढते.हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी चालणं हा उत्तम व्यायाम आहे असं तज्ज्ञ सांगतात.पण,श्वसनासंबंधीचे आजार असलेल्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने चालण्याचा व्यायाम करावा.चालण्याचे आणखीन फायदे काय आहेत,याविषयी…
१. कॅलरीज कमी करण्यासाठी…
चालण्याने शरीरातील अतिरिक्त कॅलरीज कमी होण्यास उपयोग होतो.भरभर चालण्याने हृदयाच्या ठोक्यांची गती वाढते.त्यामुळे कॅलरीजचे प्रमाण कमी होते.शिवाय,शरीरात ऊर्जासुद्धा निर्माण होते.पण,तुम्ही दिवसभरात जेवढे चालता त्यापेक्षा अधिक पटीने कॅलरीजचं सेवन करत असाल तर त्या व्यायामाचा काहीच फायदा होत नाही,हे लक्षात ठेवा.त्यामुळे कॅलरीजचे सेवन संतुलित प्रमाणात झाले पाहिजे.धावणं,स्विमिंग आणि सायकल चालवल्याने जेवढ्या कॅलरीज कमी होतात तेवढ्याच जलद चालण्याने होतात.
२. रोगप्रतिकार शक्ती वाढते
सध्या रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यावर अधिक भर दिला जात आहे.त्यासाठी चालणं हा उत्तम व्यायाम आहे.चालल्याने रक्तातील पांढऱ्या रक्तपेशी प्रमाणात वाढतात.त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते.कोणत्याही रोगाचा सामना करण्यासाठी शरीर सज्ज होते.
३. ताण हलका होण्यास मदत
साधारण तीस मिनिटे चालल्याने मूड चांगला राहण्यास मदत होते,असे अनेक संशोधनांती सिद्ध झाले आहे.यामुळे ताण हलका होण्यास मदत होते.नैराश्याला सामोरे जाणाऱ्यांना अधिकाधिक चालण्याचा सल्ला दिला जातो.मनावर ताण जाणवत असल्यास किंवा टेन्शन आल्यास तुमच्या क्षमतेनुसार वेगाने चाला.
४. जपा हदयाचं आरोग्य
हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी जास्तीत जाास्त चालणं फायद्याचे असते.परिणामी,शारीरिक आरोग्य जपले जाते.त्यामुळे हृदयरोग असलेल्या रुग्णांना चालण्याचा सल्ला दिला जातो.पण,सारखा दम लागत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने चालण्याचा वेग आणि वेळ ठरवावी.जेणेकरुन काही अपाय होणार नाही.
५. ऊर्जेचा स्रोत
चालण्याने रक्तप्रवाहाची प्रक्रिया सुरळीत पार पडते.ऑक्सिजन आणि इतर पोषणमूल्य शरीराच्या सर्व भागात पोहोचतात.परिणामी,शारीरिक क्रिया करण्यास ऊर्जा मिळते आणि मूडही चांगला राहतो,असे तज्ज्ञ सांगतात.









































































