Last Updated on 05 Aug 2023 10:11 PM by Sanjay Patil/Adhorekhit
महसूल सप्ताहातच तहसिलदार लाच घेताना सापडल्याने महसूल विभागात एकच खळबळ
नाशिक । नाशिकमधील तहसीलदाराला 15 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पडकडण्यात आले आहे.नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही मोठी कारवाई केली.नाशिक तहसीलदार नरेश कुमार बहिरम हे आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले.
विशेष म्हणजे, राज्यभरात महसूल सप्ताह साजरा होत असतानाच तहसिलदार लाच घेताना सापडल्याने महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.
ही कारवाई अधीक्षिका शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.गौण खनिज प्रकरणातील 1 कोटी 25 लाख 6 हजार 220 रुपयांच्या दंडाची रक्कम कमी करण्यासाठी नरेश कुमार यांनी 15 लाख रुपयांची लाच मागितली होती.एकदा झालेला आदेश फेरतपासणीसाठी घेण्यासाठी मागणी करण्यात आली होती.
नाशिक तालुक्यातील राजुर बहुला येथील जमिनीच्या मालक यांच्या जमिनीमध्ये मुरुम उत्खननाबाबत मूल्य नियमानुसार पाचपट दंड,स्वामित्वधन जागा भाडे मिळून एकूण रक्कम सव्वा कोटी रूपये याप्रमाणे दंड आकारणी बाबत बहिरम यांच्या कार्यालयाकडून आदेश आले होते.त्या आदेशाविरुद्ध जमिनी मालक यांनी उपविभागीय अधिकारी नाशिक यांच्याकडे अपील दाखल केले होते.
त्याबाबत आदेश होऊन या प्रकरणाची पुन्हा फेर चौकशीसाठी नरेशकुमार बहिरम (तहसीलदार नाशिक) यांच्याकडे पाठवण्यात आले होते. या मिळकती मधील उत्खनन केलेला मुरूम त्याच जागेत वापर वापर झाल्याचे जमिनी मालक यांनी त्यांच्या जबाबात नमूद केले होते.त्याबाबत आदेश होऊन सदरचे प्रकरण फेर चौकशीसाठी तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांच्याकडे पाठवण्यात आले होते.
हेही वाचा – राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये तब्बल 19 हजार पदांची मेगाभरती
सदर मिळकतीमधील उत्खनन केलेला मुरूम त्याच जागेत वापर झाल्याच्या जमिनीच्या मालक यांनी स्पष्ट केले होते. जमीन मालकाने सांगितल्यानुसार याच्या पडताळणीसाठी संशयित बहिरम यांनी जमिनीच्या मालकांना त्यांच्या मालकीच्या राजुर बहुला येथे स्थळ निरीक्षणसाठी बोलावले होते.त्यावेळी त्यांनी तक्रारदार यांच्याकडे तडजोडीअंती 15 लाख रुपयांची लाच स्वरूपात मागणी केली.सदरील लाच मागणी केल्याचे पडताळणी पंचनामा वेळी मान्य करून लाच स्वीकारण्याचे मान्य केले.तहसीलदार बहिरम यांना कर्मयोगी नगर येथील राहते घराचे अपार्टमेंट पार्कीगमध्ये स्विकारल्याने त्यांना पकडण्यात आले.तसेच मागणी केलेली लाचेची रक्कम आज स्वीकारल्याने संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक संदीप घुगे यांच्यासह पोलीस निरीक्षक स्वप्निल राजपूत,पोलीस नाईक गणेश निंबाळकर,प्रकाश महाजन,नितीन नेटारे यांच्या पथकाने केली.
आवाहन
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी अथवा करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांक 1064 वर संपर्क साधावा.












































































