Last Updated on 17 Dec 2023 4:28 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नागपूर । स्फोटके आणि रसायने असलेल्या कारखान्यात स्फोट होऊन नऊ जण ठार झाले. नागपुरातील सोलार एक्सप्लोरी या कारखान्यात मोठ्या प्रमाणावर दारूगोळा आणि रसायने असल्यामुळे मृत्यूची संख्या वाढू शकते, अशी भीती व्यक्त होत आहे.
बाजार गाव येथे असलेल्या स्फोटकांच्या निर्मिती करणाऱ्या कारखान्यात मोठा स्फोट झाला. या स्फोटात इमारत उध्वस्त झाली. त्यात नऊ लोकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांचे पथक तेथे पोहोचले आहे. काही इमारतीच्या आत अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या कंपनीत दारूगोळा तयार केला जातो. हा दारुगोळा लष्कराला पुरवला जातो. दारूगोळा बनवण्याचे काम सुरू असतानाच हा स्फोट झाला.
यापूर्वी 2018 मध्येही कंपनीत स्फोट झाला होता. त्यात एका कामगाराचा मृत्यू झाला होता. सुमारे सहा महिन्यांपूर्वी 2023 मध्येही कंपनीत स्फोटाची घटना घडल्याचा आरोप झाला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार युवराज चारोडे (रा. बाजारगाव),ओमेश्वर मच्छीर्के (रा. चाकडोह, ता. नागपूर), मिता उईके (अंबाडा सोनक, ता, काटोल), आरती सहारे (रा. कामठी, ता. काटोल), श्वेताली मारबते (रा. कन्नमवार जि. वर्धा), पुष्पा मानापुरे (रा. शिराळा, जि. अमरावती), भाग्यश्री लोणारे (रा. भुज तुकुम जि. अमरावती), ऋमिता उईके (रा. ढगा, जि. वर्धा), मौसम पटेल (रा. मोहाडी, जि. भंडारा) ही मृतकांची नावे आहेत.
मुख्यमंत्र्यांकडून दुर्घटनेवर शोक व्यक्त…मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत
नागपूर | नागपुरातील एका उपकरण निर्मिती कारखान्यात झालेल्या स्फोटाच्या दुर्घटनेतील मृत्यूंबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. मृत आणि त्यांच्या कुटुंबियांप्रति सहवेदना व्यक्त करून वारसांना पाच लाख रुपयांची मदत देण्याचेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे.
या कारखान्यात संरक्षणदृष्ट्या महत्त्वाची उत्पादने निर्माण होत असल्याने मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासन, पोलीस व संबंधित सर्व यंत्रणांना मदत व अनुषंगाने निर्देश दिले आहेत. या दुर्दैवी घटनेतील जखमींना वेळेत व दर्जेदार उपचार उपलब्ध करून देण्याच्या सूचना देखील त्यांनी केल्या आहेत.










































































