Last Updated on 26 Aug 2024 1:21 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नांदेड । नांदेडचे खासदार आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते वसंतराव चव्हाण यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर हैदराबाद येथेली किम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. आज पहाटे चार वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
मागील दोन दशकांत राज्य विधिमंडळाच्या दोन्हीही सभागृहांत प्रतिनिधीत्व केल्यानंतर काँग्रेसने वसंतराव चव्हाण हे वयाच्या सत्तरीत २०२४ मध्ये लोकसभेत निवडून आले होते. १९५७ पासून नांदेड जिल्ह्यात बहुतांश खासदार पहिल्याच प्रयत्नात लोकसभेवर निवडून गेले. त्या मालिकेत सरपंचपदापासून राजकीय कारकीर्द सुरु करणा-या वसंतरावचे नावही घेतले जाते.
वसंतराव चव्हाण यांचा राजकीय प्रवास
वसंतराव चव्हाण यांच्या राजकीय कारकीदीर्ची सुरुवात त्यांच्या गावातून झाली. १९७८ साली नायगाव या त्यांच्या मूळगावचे ते सरपंच झाले. त्यानंतर २००२ ला जिल्हा परिषदेवर ते निवडून आले. त्याच काळात त्यांना विधानपरिषदेवर आमदार होण्याची संधी चालून आली. पुढे १६ वर्षे ते विधान परिषद आणि विधानसभेचे सदस्य राहिले. २००९ ला अपक्ष निवडणूक लढवत नायगाव मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला आणि काँग्रेस पक्षात प्रवेश केला. २०१४ मध्ये पुन्हा एकदा त्यांची विधानसभेवर निवड झाली. २०१९ च्या निवडणुकीत मात्र त्याचा पराभव झाला. अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय अशी त्यांची ओळख होती. मात्र अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यानंतरही ते काँग्रेसमध्ये राहिले. आणि लोकसभेची निवडणूक जिंकूण नांदेड हा काँग्रेसचा बाल्लेकिल्ला असल्याचे दाखवून दिले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खासदार वसंत चव्हाण यांना श्रद्धांजली
मुंबई : जनतेच्या आशा आकांक्षांशी समरस झालेले लोकाभिमुख नेतृत्व खासदार वसंत चव्हाण यांच्या निधनामुळे गमावले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ नेते, नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, जनतेच्या आशा आकांक्षांशी समरस झालेले नेतृत्व म्हणून खासदार चव्हाण यांची ओळख कायम राहील. नायगावचे सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, विधिमंडळातील दोन्ही सभागृहातील सदस्य तसेच लोकसभा सदस्य असा त्यांचा राजकीय आलेख राहिला आहे. घरातून मिळालेला समाजकारण, राजकारणाचा वारसा चालवताना त्यांनी नेहमीच लोकाभिमुख भूमिका घेऊन सहकार तसेच विविध क्षेत्रांत काम केले. नायगाव एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रातही कार्य केले. नायगाव विधानसभा क्षेत्र आणि नांदेड जिल्ह्याच्या विकासासाठी झटणारे ज्येष्ठ नेतृत्व आपण गमावले आहे. त्यांच्या निधनामुळे चव्हाण कुटुंबियांवर आघात झाला आहे. ईश्वराने त्यांना हा आघात सहन करण्याची ताकद द्यावी अशी प्रार्थना करतो. ज्येष्ठ नेते, खासदार वसंत चव्हाण यांना भावपूर्ण श्रद्धांजली!









































































