Last Updated on 19 May 2023 3:57 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली । नव्याने बांधलेल्या संसद भवनाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 28 तारखेला होणार आहे.लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी काल पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांना संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्याचं आमंत्रण दिले.आत्मनिर्भर भारताचे प्रतिक असलेल्या नवीन संसद भवनाच्या इमारतीची पायाभरणी पंतप्रधानांनी 10 डिसेंबर 2020 रोजी केली होती.’सेन्ट्रल व्हिस्टा’ विकास प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेली नव्या ‘संसद भवन’ची इमारत सर्व सुविधांनी सज्ज आहे.
सध्याचे संसद भवन 1927 मध्ये बांधलेले आहे; त्याला आता जवळपास 100 वर्ष पूर्ण होतील.या संसदेतील जागेची आणि सुविधांची कमतरता लक्षात घेऊन; नवीन संसद भवन उभारण्यात यावे असा प्रस्ताव लोकसभा आणि राज्यसभेनं मंजूर केला होता.त्यानुसार नवीन इमारतीत भविष्याचा विचार करून अतिरिक्त आसन क्षमता आणि आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.10 डिसेंबर 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या संसद भवनाचे भूमिपूजन करण्यात आलं.

या इमारतीच्या बांधकामासाठी साधारण 1 हजार 200 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. विशेष म्हणजे या इमारतीत एकूण 5 हजार कलाकृती असणार आहेत.त्रिकोणी आकार असलेली ही चार मजली इमारत एकूण 64 हजार 500 स्केअर किलोमीटर परिसरात वसलेली आहे..नव्या संसद भवनात अत्याधुनिक सुविधा पुरवण्यात आल्या आहेत.आता असलेल्या जुन्या संसद भवनपेक्षा नवं संसद भवन तब्बल 1700 चौरस मीटर मोठे आहे.

संसदेच्या सध्याच्या इमारतीत लोकसभेतील 550 तर राज्यसभेत 250 सदस्यांची बैठकीची व्यवस्था करण्यात आली आहे. भविष्यातील गरजा लक्षात घेऊन संसदेच्या नवीन बांधलेल्या इमारतीत लोकसभेतील 888 आणि राज्यसभेतील 384 सदस्यांच्या बैठकीची व्यवस्था करण्यात आली आहे.नवीन संसद भवन हे आत्मनिर्भर भारताचं मंदिर आणि देशाच्या विविधतेचं प्रतिबिंब आहे.











































































