Last Updated on 16 Jun 2025 9:18 PM by Sanjay Patil/Adhorekhit
समृद्ध शिक्षणव्यवस्थेसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण, तंत्रज्ञानाचा वापर व शिक्षक-पालक सुसंवाद महत्त्वाचा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पालघरमधील जि. प. शाळा दुर्वेस येथील विद्यार्थ्यांचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
पालघर, दि. १६: गुणवत्तापूर्ण शिक्षण, तंत्रज्ञानाचा वापर आणि शिक्षक-पालक यांचा सुसंवाद हीच भविष्यातील समृद्ध शिक्षणव्यवस्थेची किल्ली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, दुर्वेस येथे शाळाभेटी दरम्यान केले.

नवीन शैक्षणिक वर्ष २०२५–२६ च्या प्रारंभाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शाळेला भेट देत नवप्रवेशित विद्यार्थ्यांना गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वाटप करून त्यांचे औपचारिक स्वागत केले. विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांनी त्यांचे मनोबल वाढवले. यावेळी औषधी वन उद्यानात वृक्षारोपण करून पर्यावरणपूरक संदेश दिला.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी डिजिटल क्लासरूम, आयसीटी लॅब, विज्ञान प्रयोगशाळा, ग्रंथालय, औषधी वन उद्यान, टेरेस गार्डन आदी सुविधांची पाहणी करत त्याबाबत समाधान व्यक्त केले. पीएम श्री योजनेअंतर्गत विकसित झालेली ही शाळा जिल्ह्यातील एक आदर्श शाळा म्हणून ओळखली जाते.

मुख्यमंत्र्यांनी उपस्थित पालकांशी संवाद साधत त्यांचे अनुभव जाणून घेतले. यावेळी पालकांनी अभिमानाने सांगितले की, “या शाळेमध्ये मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळते, शिक्षकांची मेहनत दिसून येते, विविध उपक्रम राबवले जातात, यासाठी आम्ही मुलांना या शाळेत पाठवतो. तसेच विद्यार्थ्यांना डिजिटल बोर्डावर लिहिण्याचाही सराव दिला जातो. आधुनिक शिक्षण पद्धतीचा लाभ मिळतो.” या गोष्टी ऐकून मुख्यमंत्री फडणवीस यांनी समाधान व्यक्त करत पालक, शिक्षक आणि शिक्षण विभागाच्या प्रयत्नांचे कौतुक केले.

या कार्यक्रमास वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक, माजी मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार डॉ. हेमंत सावरा, आमदार सर्वश्री विलास तरे, राजन नाईक, राजेंद्र गावित, निरंजन डावखरे, शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव आय. एन. कुंदन, शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह, जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सोनाली मातेकर, तसेच विविध विभाग प्रमुख, शिक्षकवर्ग, मुख्याध्यापिका, पालक व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
राज्य शासनाच्या ‘१०० शाळा भेट’ उपक्रमाअंतर्गत मुख्यमंत्री पालघर दौऱ्यावर असून १६ व १७ जून २०२५ रोजी जिल्ह्यातील १४२ शाळांना मंत्री, लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी भेटी देणार आहेत. या उपक्रमामुळे शाळा, विद्यार्थी आणि पालक यांच्यातील नाते दृढ होत असून, शाळेतील उपस्थिती आणि शैक्षणिक गुणवत्ता यामध्ये सकारात्मक बदल घडण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.













































































