Last Updated on 27 Oct 2022 9:22 PM by Sanjay Patil/Adhorekhit
![]()
🌑 नवेखेडच्या तरुणांनी उचलले आदर्शवत आणि नवी दिशा देणारे पाऊल !
🌑 समाजाला नवीन दिशा देण्याचे शंभुराजे प्रतिष्ठानच्या तरुणाईचे काम
🌑 दीपावली पाडव्यास बळीराजाचे स्मरण,भव्य शोभायात्रा
🌑 धनगरी ढोल,हलगीच्या निनादात बैल,बैलगाड्या,ट्रॅक्टर याची मिरवणूक
![]()
अंकुश चव्हाण/अधोरेखित वृत्तसेवा
सांगली । नवेखेडच्या तरुणांनी उचलले आदर्शवत आणि नवी दिशा देणारे पाऊल !
निघाला बळीराजाचा पालखी सोहळा ! भारतीय समाजातील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व बहुजनांचा महानायक,तत्त्ववेत्ता बळीराजा याचा पालखी सोहळा व शोभायात्रा दीपावली पाडव्यानिमित्त वाळवा तालुक्यातील नवेखेड येथे उत्साहाने संपन्न झाली.
अंधश्रद्धा आणि अतिश्रद्धा याच्यामध्ये अडकलेल्या समाजाला आपल्या मूळ महापुरुषांची माहिती व्हावी व बहुजन समाजाला आपला मूळ पुरुष,विज्ञाननिष्ठ आणि परिवर्तनवादी,बळीराजाचे स्मरण व्हावे आणि त्याचे विचार पेरले जावेत यासाठी या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.नवेखेड येथील मराठी शाळेजवळून या सोहळ्यास सुरवात झाली.आजचा समाज ज्योतिबा,भैरोबा,खंडोबा,म्हसोबा,बिरोबा यांचा पूजक आहे.पण हे सरदार ज्या राजाचे होते त्या राजाचे स्मरण होणे गरजेचे ते स्मरण पालखीच्या माध्यमातून समाजाला व्हावे अशा उद्देशाने हा पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता.

शेतकरी कुटूंबातील महिलांनी ठिकठिकाणी बळीराजाचे औक्षण केले.
यावेळी धनगरी ढोल,हलगीच्या निनादात बैल,बैलगाड्या,ट्रॅक्टर याची मिरवणूक काढण्यात आली.नांगर सजवून ट्रॅक्टर ट्रॉलीत ठेवला होता.व भव्य शोभायात्रा काढण्यात आली.तरुणांनी पारंपरिक पोशाख परिधान केले होते.यावेळी ‘इडा पिडा टळो दे आणि बळीच राज्य येवो दे’,अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.यामध्ये नवेखेड व परिसरातील तरुणांनी मोठयाप्रमाणात सहभाग घेतला.
बळीराजाची प्रतीकात्मक पालखी सवाद्य गावातून फिरवली गेली.यावेळी अनेक शेतकरी कुटूंबातील महिलांनी बळीराजाचे औक्षण केले.आजच्या समाजातील श्रद्धा आणि अंधश्रद्धा त्यांच्या विळखातून समाजाला बाहेर काढून नवीन दिशा देण्याचे काम शंभुराजे प्रतिष्ठानच्या तरुणाईने केले आहे.
तसेच गड संवर्धन,रक्तदान शिबिर,अंधश्रद्धा निर्मूलन,युवा शिबीर,शाळा संवर्धन,व्यसनमुक्ती वृक्षारोपण,करियर मार्गदर्शन,वैज्ञानिक दृष्टिकोन,प्रचार-प्रसार आदी कार्य करत अशा विविध उपक्रमातून तरुणांनी जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात आदर्श निर्माण केला आहे.अनिष्ट रूढी आणि परंपरेतून समाजाला बाहेर काढण्याससाठी तरुणांनी उचललेलं महाराष्ट्रातील पहिले आदर्शवत आणि नवी दिशा देणारे पाऊल आहे!
![]()












































































