Last Updated on 22 Aug 2024 9:33 AM by Sanjay Patil/Adhorekhit
बीड । राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हफ्ता बुधवारी (ता. 21) राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे वितरीत करण्यात आला.पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये 2 हजार रुपयांची रक्कम थेट जमा केली जात आहे.
परळी येथील कृषी महोत्सवाच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे,राज्य कृषि मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल तसेच विधानपरिषद सदस्या आमदार पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत योजनेचा चौथा हफ्ता थेट वर्ग करण्यात आला आहे.
हेही वाचा – ‘लाडकी बहीण योजनेनंतर आता ‘लाडका शेतकरी’ अभियान राबवणार…
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यासोबतच लाडक्या भावांना विद्यावेतन देण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणली. आता याच धर्तीवर विविध लाभांच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी लाडका शेतकरी अभियान सुरु करण्याची घोषणा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केली. याची सुरुवात आज नमो शेतकरी महासन्मान योजनेचा दोन हजार रुपयांचा चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करून होत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते रिमोटद्वारे नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे जमा करण्यात आला. तसेच सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पाच हजार रुपये अनुदान वितरीत करण्यासाठी वेबपोर्टलही कार्यान्वित करण्यात आले.कृषि विभागाच्या विविध योजनांच्या माहितीचा समावेश असलेल्या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन करण्यात आले.
राज्यातील शेतकरी समृद्ध व्हावा, यादृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न करत असलेल्या महायुती सरकारच्या माध्यमातून आज नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या चौथ्या हप्त्याचे वितरण करण्यात आले. याद्वारे राज्यातील सुमारे 91 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी दोन हजार प्रमाणे 1958 कोटी रुपये रक्कम वितरित करण्यात आली.
हेही वाचा – सोयाबीन व कापसाला हेक्टरी पाच हजार रुपये मदत देण्यातील ई पीक पाहणीची अट रद्द
राज्यभरातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान योजनेची संलग्न असलेली नमो शेतकरी महासंघ निधी योजनेची घोषणा केली आणि या योजनेची 2023 यावर्षीपासून अंमलबजावणी देखील करण्यात आली.योजनेअंतर्गत पीएम किसान सन्मान योजनेप्रमाणेच केवळ महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजनेद्वारे 6 हजार रुपये देण्यास सुरुवात झाली आणि या योजनेचे आता 4 हफ्ते राज्यातील शेतकऱ्यांना जमा करण्यात आले आहेत.
हेही वाचा – शाळा परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणं बंधनकारक…









































































