Last Updated on 13 Apr 2023 5:45 PM by Sanjay Patil/Adhorekhit
कुठल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे किती संपत्ती?; जाणून घ्या
सर्वात श्रीमंत आंध्रचे तर गरीब पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी 510 कोटींसह अग्रस्थानी
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या एकमेव करोडपती नसणाऱ्या मुख्यमंत्री
नवी दिल्ली | देशातील श्रीमंत मुख्यमंत्र्यांची यादी असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने (Association for Democratic Reforms) नुकतीच जाहीर केली आहे. सध्याच्या विद्यमान 30 पैकी 29 मुख्यमंत्री कोट्यधीश एडीआरने म्हटले आहे.यात मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी हे देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री ठरले असून त्यांच्याकडे एकूण ५१० कोटींची मालमत्ता आहे. तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या 15 लाखांच्या संपत्तीसह शेवटच्या क्रमांकावर आहेत.
श्रीमंतांच्या या यादीत आंध्र प्रदेशचे जगनमोहन रेड्डी (510 कोटी), अरुणाचल प्रदेशचे पेमा खांडू (163 कोटी) आणि ओडिशाचे नवीन पटनाईक (63 कोटी) हे पहिल्या तीन क्रमांकावर आहेत.
सर्वात खालच्या स्थानी म्हणजेच शेवटच्या तीन मुख्यमंत्र्यांमध्ये पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी (15 लाख), केरळचे पिनराई विजयन (1 कोटी) आणि हरियाणाचे मनोहरलाल (1 कोटी) यांचा समावेश आहे.दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे स्वतःचे उत्पन्न 2 लाखांहून अधिक असून एकूण संपत्ती 3 कोटींहून अधिक आहे.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे प्रत्येकी 3 कोटींची संपत्ती आहे.
43 टक्के मुख्यमंत्र्यांवर फौजदारी खटले
असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स रिपोर्टनुसार, 30 मुख्यमंत्र्यांपैकी 29 (97 टक्के) जण करोडपती असून प्रत्येक मुख्यमंत्र्यांची सरासरी मालमत्ता 33.96 कोटी आहे.ADR अहवालानुसार,30 मुख्यमंत्र्यांपैकी 13 (43 टक्के) जणांनी आपल्यावर खून,हत्येचा प्रयत्न,अपहरण आणि गुन्हेगारी धमकावणे यासह गंभीर गुन्हे दाखल असल्याचे जाहीर केले आहे.
महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांकडे किती कोटी ?
या अहवालात नमूद करण्यात आलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे 11.56 कोटी रुपयांची संपत्ती आहे. ते देशातील अकरावे सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री आहेत.
असे आहे शिक्षण
11 मुख्यमंत्री हे पदवीधर असून 3 मुख्यमंत्री 12 वी उत्तीर्ण, 4 व्यावसायिक पदवीधर, 1 डिप्लोमा होल्डर, 1 डॉक्टरेट, तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकटे 10 वी उत्तीर्ण आहेत.एडीआरच्या अहवालात मुख्यमंत्र्यांची शिक्षणविषयक माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दहावी उत्तीर्ण आहेत तर आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा हे डॉक्टरेट आहेत. मुख्यमंत्र्यांची शैक्षणिक पार्श्वभूमीची दखल एडीआरने घेतली आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या यादीत 11 व्या क्रमांकावर आहेत. एकनाथ शिंदे यांच्याकडे तब्बल 11 कोटींची संपत्ती आहे. त्यामुळे करोडपती मुख्यमंत्र्यांच्या यादीत एकनाथ शिंदे यांचाही समावेश आहे.
राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सर्व 30 विद्यमान मुख्यमंत्र्यांनी दाखल केलेली स्वत:ची मतदान प्रतिज्ञापत्रांच्या विश्लेषणानंतर सर्वात श्रीमंत मुख्यमंत्र्यांबाबत निष्कर्ष काढले असल्याचे एडीआर आणि इलेक्शन वॉच (एनईडब्लू) या संस्थांनी म्हटले आहे.
कुठल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे किती संपत्ती ?
आंध्र प्रदेश – 510.38 कोटी
अरुणाचल – 163.50 कोटी
ओडिशा – 63.87 कोटी
नागालॅंड – 46.95 कोटी
पद्दुचेरी – 38.39 कोटी
तेलगंणा – 23.55 कोटी
छत्तीसगड – 23.05 कोटी
आसाम – 17.27 कोटी
मेघालय – 14.06 कोटी
त्रिपुरा – 13.90 कोटी
महाराष्ट्र – 11.56 कोटी
गोवा – 9.37 कोटी
कर्नाटक – 8.92 कोटी
तामीळनाडू – 8.88 कोटी
झारखंड – 8.51 कोटी
गुजरात – 8.22 कोटी
हिमाचल – 7.81 कोटी
मध्य प्रदेश – 7.66 कोटी
राजस्थान – 6.53 कोटी
उत्तराखंड – 4.64 कोटी
सिक्कीम – 3.89 कोटी
मिझोरम – 3.84 कोटी
दिल्ली – 3.44 कोटी
बिहार – 3.09 कोटी
पंजाब – 1.97 कोटी
उत्तर प्रदेश – 1.54 कोटी
मनिपूर – 1.47 कोटी
हरयाणा – 1.27 कोटी
केरळ – 1.18 कोटी
पचिम बंगाल- 15 लाख










































































