Last Updated on 03 Jan 2024 6:29 AM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली | राज्यासह देशभरात सुरू असलेल्या संपावर तोडगा निघाला आहे.केंद्रीय गृहमंत्रालय आणि ट्रान्सपोर्ट संघटनेच्या बैठकीनंतर देशभरातील ट्रक आणि टँकर चालकांनी आपला संप मागे घेतला आहे. तसेच ट्रान्सपोर्ट संघटनांनी चालकांना कामावर येण्याचे आवाहन केले आहे.या बैठकीत केंद्र सरकार आणि ट्रक चालकांच्या संघटनांशी सकारात्मक चर्चा झाल्याने देशातील सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.
नवीन वाहन कायद्यातील ‘हिट अँड रन’ च्या शिक्षेविरोधात ट्रक-टँकर चालक मागील दोन दिवसांपासून संपावर गेले होते.या नवीन कायद्यानुसार हिट अँड रनमध्ये वाहन चालकाला दहा वर्षाची शिक्षा व सात लाख रुपये दंडांची तरतूद करण्यात आली आहे.तसेच हा कायदा आता अजामीनपात्र असल्याने या कठोर तरतुदीविरोधात मोटार मालक कामगार वाहतूकीच्या विविध संघटनांतर्फे संप पुकारण्यात आला होता.
देशभरात ट्रक चालकांनी संप पुकारल्याने पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याचे चित्र होते.पेट्रोल भरून घेण्यासाठी ठिकठिकाणी पेट्रोल पंपावर रांगाच रांगा लागल्या होत्या.या संपाची धग तीव्र होत असताना दुसरीकडे केंद्र सरकारने मालवाहतूकदारांच्या संघटनांना चर्चेसाठी बोलावले.या चर्चेत संपाबाबत अखेर तोडगा काढण्यात आला.
नवीन वाहक कायदा काय?
भारतीय दंड संहिता भारतीय न्यायिक संहितेद्वारे बदलण्यात आली आहे. यामध्ये ‘हिट अँड रन’बाबत कडक तरतूद करण्यात आली आहे.विशेषत: अशा परिस्थितीत जेव्हा, गंभीर अपघातानंतर, चालक घटनास्थळावरून फरार होतो आणि अधिकाऱ्यांना माहिती देत नाही. नवीन कायद्यानुसार अपघातानंतर जखमी व्यक्तीला सोडून चालक पळून गेला तर चालकाला 7 लाख रुपयांचा दंड होऊ शकतो. एवढेच नाही तर त्याला 10 वर्षांची शिक्षाही होऊ शकते. चालकाने थांबवून जखमी व्यक्तीला रुग्णालयात नेल्यास शिक्षा कमी होण्याची तरतूद आहे.











































































