Last Updated on 29 Oct 2024 10:31 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । इस्लामपूर येथील माणुसकीचं नातं प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही गरजू गरीब कुटुंबे आणि गरजू दिव्यांग कुटुंबीयांना दिवाळीनिमित्त किराणा माल व दिवाळी निमित्त लागणाऱ्या तत्सम साहित्याचे किट देण्याचा उपक्रम सेवाभावी सदस्यांच्या सहयोगाने पार पडला. बहे, कापूसखेड, इस्लामपूर, उरुण, रेठरेधरण आदी परिसरातील गरजू व दिव्यांग कुटुंबीयांना प्रतिवर्षाप्रमाणे अन्नधान्य किट देण्यात आले.
गेल्या पाच वर्षापासून प्रतिवर्षी दर दिवाळीला हा उपक्रम राबविला जातो. येथील या आधीचे पोलीस उपाधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या कल्पनेतून या प्रतिष्ठानची निर्मिती झाली. प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.डॉ.अशोक शिंदे तसेच उपाध्यक्ष उमेश कुरळपकर, सचिव प्राचार्य महेश जोशी, खजिनदार गौतम रायगांधी, या आधीचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख तसेच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संपत वारके, उद्योजक दीपक कोठावळे,सतीश सूर्यवंशी, विकास राजमाने, ॲड. विजय कांईगडे, अमित यादव, डॉ. विक्रांत पाटील यांच्यासह प्रतिष्ठानचे कार्यकारणी आणि सर्व सदस्य प्रतिष्ठानच्या सामाजिक उत्तरदायित्व जपणाऱ्या उपक्रमात सतत सक्रिय असतात. ‘माणुसकीच नातं’ या रजिस्टर एनजीओ च्या वतीने गेल्या पाच वर्षात कोरोना काळात ६७ दिवस सुमारे ७५० गरजू कुटुंबांना दिलेल्या फूड पॅकेटस पासून ते मधल्या काळात प्रतिवर्षी दिनांक एक मे रोजी महाराष्ट्र व कामगार दिनाच्या निमित्ताने महा रक्तदान शिबिर, वाचन प्रेरणेसाठी वाळवा शिराळ्यातील वाचकांना पुस्तक भेट, इस्लामपूर पोलीस ठाण्यांमध्ये जायंट्स ग्रुपच्या सहकार्याने मोफत ओपन जिम, ५० गरजू गरीब विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यासिका, गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप, अशा अनेक विध सामाजिक उपक्रम केवळ सदस्यांच्या उस्फुर्त सहकार्यामुळे, सहभागामुळे राबवले जातात. या उपक्रमांसह दिवाळी दिव्यांगांसाठी, गरीब कुटुंबांसाठी, आशा वर्कर्स महिला भगिनींसाठी, दिवाळी इस्लामपूर शहरातील वृत्तपत्र सायकल वरून वाटणाऱ्यांसाठी; असे उपक्रम दिवाळी वेळी या प्रतिष्ठानने राबविले आहेत.

सर्वजण आपल्या कुटुंबांसाठी…जवळच्या नातेवाईकांसाठी…आपापल्या परिस्थिती,इच्छा आणि कुवतीप्रमाने दिवाळी हा वर्षातून येणारा सण साजरा करतच असतात. आपल्याबरोबर ही दिवाळी आपल्या प्रमाणे गरजू, गरीब, उपेक्षित गरजू, गरीब दिव्यांगा साठी देखील साजरी व्हावी हा प्रतिष्ठानचा हेतू असतो.
इस्लामपूर येथे ज्येष्ठ उद्योजक आनंदराव शेलार यांच्या हस्ते तर बहे येथे ज्येष्ठ नागरिक पांडुरंग गुरव यांच्या हस्ते अन्नधान्य किट देण्यात आली. सदर किटमध्ये डाळ, गोडे तेल, तांदूळ, रवा, भाजके पोहे,साखर, चिवडा, बुंदी, सुवासिक तेल,मसाला, मोती साबण,उटणे; अशा वस्तूंचा समावेश आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संपत वारके तसेच प्रतिष्ठानचे कार्यकारणी सदस्य यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला.









































































