Last Updated on 02 Oct 2024 12:05 PM by Sanjay Patil/Adhorekhit
रंगीबेरंगी अंथरून – पांघरूणांमुळे घाटांचे सौंदर्य खुलले!
सांगली । नवरात्रोत्सवच्या पार्श्वभूमीवर घरोघरी स्वच्छता मोहीम सुरू झाली आहे. कृष्णानदीच्या विविध घाटांवर तसेच बहे येथील रामलिंग बेट परिसरात कृष्णा नदीपात्रात कपडे धुण्यासाठी गेल्या चार दिवसांपासून गर्दी होत आहे. नदी पात्रातील खडकांवर तसेच विविध घाटांवर विविध रंगाची अंथरूण-पांघरूणे वाळत घातल्याने हा परिसर दिवसभर ‘कलरफुल’ दिसत आहे.

पितृ पंधरवड्यानंतर घटस्थापना होत असते.गुरुवारी, ३ ऑक्टोबर रोजीच्या घटस्थापनेपासून नवरात्रोत्सवाला सुरवात होणार आहे. भारतीय संस्कृतीमध्ये नवरात्री व दसऱ्याच्या सणाला महत्त्वाचे स्थान आहे. नवीन कार्याच्या शुभारंभासाठीही हा दिवस शुभ समजला जातो.त्यामुळे घराच्या स्वच्छतेबरोबरच घरातील कपडे,कापडी साहित्य,भांडीकुंडी यांची साफसफाई केली जात आहे.त्यातील एक भाग म्हणून घरातील अंथरूण-पांघरूण अशी सर्व कपडे स्वच्छ केली जातात.

दरवर्षी बहे येथील रामलिंग बेट परिसरात कृष्णा नदीपात्रात कपडे धुण्यासाठी या काळात लोकांची गर्दी असते.या ठिकाणी महिला मंडळींबरोबरच पुरुष व बच्चेकंपनींची कपडे धुण्यासाठी गर्दी होत आहे. भिलवडी (ता. पलूस) येथील कृष्णानदीच्या घाटावर भिलवडी व आसपासच्या १२ वाड्या आणि विविध गावातील लोक अंथरून- पांघरूण धुण्यासाठी अप्रतिम दगडी बांधकाम असलेल्या या भल्या मोठ्या घाटावरती येत आहेत.

विविध रंगाची अंथरूण-पांघरूणे खडकांवर वाळवण्यासाठी पसरली जातात. विविध रंगाची कपडे वाळत घातल्यानेपरिसर दिवसभर रंगबिरंगी झालरीने सजल्याचे दिसत आहे .हा परिसर सकाळी नऊ वाजल्यापासून ते सायंकाळपर्यंत रंगीबेरंगी अंथरूण-पांघरूण तसेच विविध कपड्यांनी रंगून जात आहे.










































































