Last Updated on 06 Nov 2024 6:08 PM by Sanjay Patil/Adhorekhit
US Election Updates : डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस यांचा या निवडणुकीत पराभव झाला. २०२० सालच्या पराभवानंतर चार वर्षांनी ट्रम्प पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्षपदी निवडून आले आहेत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना बहुमत मिळाले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना २७९ इलेक्टोरल मते मिळाली आहेत, तर कमला हॅरिस यांना २२३ इलेक्टोरल मते मिळाली आहेत.
अमेरिकेत एकूण ५३८ इलेक्टोरल मते आहेत, बहुमतासाठी २७० मते आवश्यक असतात.
हा एक ऐतिहासिक विजय असून अमेरिकेला महान बनवणारा आहे या विजयाबद्दल मी सर्वांचे आभार मानतो असं ट्रम्प यांनी काही वेळापूर्वीच अमेरिकेच्या जनतेला संबोधित करताना सांगितलं. डेमोक्रॅटिक पक्षाच्या,कमला हॅरिस आणि रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांच्यात अध्यक्षपदासाठी अत्यंत चुरशीची लढत होण्याची अपेक्षा होती.मात्र,आज सकाळपर्यंत मतदान झाल्यानंतर निकालांचे कल हाती येऊ लागल्यावर ट्रम्प यांनी सुरुवातीपासूनच मोठी आघाडी घेतली. ही आघाडी त्यांनी कायम ठेवली. या निवडणुकीत महत्त्वाच्या ठरणाऱ्या स्वींग स्टेट्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातही राज्यांमध्ये बहुमत मिळवण्यात कमला हॅरीस यांना अपयश आलं.
कमला हॅरिस सध्या अमेरिकेच्या उपाध्यक्ष आहेत तर डोनाल्ड ट्रम्प यांनी,२०१७ ते २०२१ या काळात राष्ट्राध्यक्ष पद भूषवलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विजयाबद्दल ट्रम्प यांचं अभिनंदन केलं आहे. आपले मित्र ट्रम्प यांच्यासोबत भारत-अमेरिका संबंध अधिक दृढ होतील, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. फ्रान्स, इस्रायल, ब्रिटनच्या राष्ट्रप्रमुखांनी ट्रम्प यांचं अभिनंदन कलं आहे.
ट्रम्प यांना शुभेच्छा देताना मोदी म्हणाले…
ऐतिहासिक निवडणूक विजयाबद्दल मनापासून शुभेच्छा माझ्या मित्रा. “भारत-अमेरिकेची जागतिक रणनितीक भागीदारी भक्कम करण्याचा माझा प्रयत्न असेल. आपण एकत्र येऊन आपल्या लोकांच्या भल्यासाठी तसच जागतिक स्तरावर शांतता, स्थिरता आणि समृद्धी आणण्यासाठी एकत्र काम करु” असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.











































































