Last Updated on 25 Sep 2023 1:05 PM by Sanjay Patil/Adhorekhit
अनंत चतुर्दशी दिवशीही हा उपक्रम राबवण्यात येणार
सांगली । डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे गणेश विसर्जनाच्या वेळी सांगली येथील कृष्णामाई घाट व बहे येथील रामलिंग बेट परिसरात निर्माल्य संकलन मोहीम राबविण्यात आली.प्रतिष्ठानचे अध्यक्ष महाराष्ट्र भूषण,पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी व रायगड भुषण डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
यावेळी गणेश भक्तांनी आणलेले निर्माल्य जमा करून घेउन त्यातील प्लॅस्टिक वेगळे करण्यात आले.उर्वरित फुले व इतर एकत्र करुन त्याचे कंपोस्ट खत तयार करुन सार्वजनिक ठिकाणी प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आलेल्या वृक्षारोपन केलेल्या झाडांसाठी वापर करण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली.

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष महाराष्ट्र भूषण,पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी,डॉ.सचिनदादा धर्माधिकारी यांनी गणेशोत्सवातील निर्माल्य व पूजा साहित्य जमा करण्याचे आवाहन केले होते.त्यानुसार शनिवारी बहे येथील रामलिंग बेट व सांगली येथील कृष्णामाई येथे अभियान राबविण्यात आले.त्यानुसार ओला व सुका कचरा वर्गवारी करण्यात आली.
प्लास्टिक पिशव्या,कापराचे डबे बाजूला काढण्यात आले.जमलेले निर्माल्य वर्गीकरण करून ते शेरे येथे व येथील कृष्णेच्या पूर्वेला खड्डे काढलेल्या त्याठिकाणी खत निर्मिती केली जाणार आहे.तयार होणारे खत दंडोबा डोंगर,भवानीनगर,गणेश खिंड,गोटखिंडी येथील सामाजिक वनीकरण जागेत प्रतिष्ठानच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आलेल्या ठिकाणी वापरण्यात येणार आहे.बहे व सांगली येथे शनिवारी दिवसभर सुमारे 8 ते 9 टन निर्माल्य जमा झाले.
अभियानात सांगली,इस्लामपूर,मिरज,विटा,तांबवे,बहे आदी ठिकाणच्या सुमारे दोनशे सदस्यांनी सहभाग घेतला.डॉ.धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे निर्माल्य जमा करण्याचा उपक्रम यापूर्वीही झाला आहे.अनंत चतुर्दशी दिवशीही हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.उपक्रमाचे परिसरातून स्वागत केले आहे.









































































