Last Updated on 16 Apr 2023 1:26 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । ज्येष्ठ निरूपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना राज्य शासनाचा प्रतिष्ठेचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काही केंद्रीय मंत्री,सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार,राज्य मंत्रिमंडळ सदस्यांसह आमदार,खासदार आणि काही उद्योजक उपस्थित होते.
नवी मुंबई येथील खारघरमधील सेंट्रल पार्क मैदानावर महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा दिमाखात पार पडला.ज्येष्ठ निरूपकार आणि पद्मश्री किताबाने सन्मानित डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना राज्य सरकारचा सर्वोच्च महाराष्ट्र भूषण पुरस्कार काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आला होता.त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या रेवदंडा इथल्या त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती.
श्रीरामाची प्रतिमा देऊन डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी त्यांनी शाल मानपत्र, २५ लाख रुपयांचा धनादेश, सन्मानचिन्ह देत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
दासबोध आणि श्री सद्गुरू चरित्रच्या माध्यमातून समाज घडवण्याचे कार्य आप्पासाहेब धर्माधिकारी प्रदीर्घ काळापासून करत आहेत.त्यांचे वडील नानासाहेब धर्माधिकारी यांच्याकडून त्यांनी हा वारसा घेतला.श्रवण बैठकांच्या माध्यमातून अध्यात्म आणि समाज परिवर्तनाचं कार्य त्यांच्याकडून गेली आठ दशके सुरू आहे. आज महाराष्ट्र सरकारच्या वतीने ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं गौरवण्यात आले.








































































