Last Updated on 07 Dec 2025 3:54 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल विभागाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अवघ्या एका वर्षात त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. याचबरोबर आता महसूल विभागामध्ये डिजीटल क्रांती घडली आहे. यापुढे डिजिटल ७/१२, ८-अ आणि फेरफार उतारे याला कायदेशीर मान्यता असणार आहे. याबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन माहिती दिली.
या निर्णयामुळे राज्यातील कोट्यवधी शेतकरी आणि जमीनधारकांसाठी सुविधा, वेग आणि पारदर्शकतेचा नवा अध्याय सुरू झाला आहे.
आता फक्त १५ रुपयांमध्ये अधिकृत ७/१२ उतारा मिळणार असून, यावर तलाठ्याच्या स्वाक्षरी आणि स्टॅम्पची कोणतीही गरज नसेल. यापूर्वी डिजिटल सातबारा मिळत होता, पण त्यावर तलाठ्याची स्वाक्षरी आणि स्टॅम्प आवश्यक असे. मात्र, आता महसूल विभागाने या प्रक्रियेत मोठा बदल केला आहे.
सोशल मीडिया पोस्टमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांनी लिहिले आहे की, डिजिटल ७/१२, ८-अ आणि फेरफार उतारे कायदेशीरदृष्ट्या वैध ठरवण्याचा ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे डिजिटल ७/१२ ला अधिकृत मान्यता मिळाली. तसेच फक्त ₹१५ मध्ये अधिकृत उतारा उपलब्ध होणार असून तलाठ्याच्या सही-स्टॅम्पची गरज संपली. डिजिटल स्वाक्षरी, QR कोड, आणि 16 अंकी पडताळणी क्रमांक असलेले ७/१२, ८-अ व फेरफार उतारे तसेच हे सर्व सरकारी, निमसरकारी, बँकिंग व न्यायालयीन कामांसाठी पूर्णपणे वैध असणार आहे. हा निर्णय शेतकरी, जमीनधारक आणि सामान्य नागरिकांसाठी सुविधा, पारदर्शकता आणि वेगवान सेवा यांचा नवा अध्याय लिहितोय. राज्यातील जनता या निर्णयाचे स्वागत करेल, याची मला खात्री आहे, असा विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.
खातेदारांना प्रमुख लाभ
हा महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र जमीन महसूल नियमपुस्तिका खंड-४ तसेच १९७१ च्या नियमांमध्ये सुधारणा करून घेण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना अनेक मोठे लाभ होणार आहेत:
-
कायदेशीर मान्यता : डिजिटल स्वाक्षरी असलेले ७/१२, ८-अ आणि फेरफार उतारे आता कायदेशीरदृष्ट्या पूर्ण वैध ठरले आहेत. त्यामुळे हे उतारे कोणत्याही सरकारी, निमसरकारी, बँकिंग किंवा न्यायालयीन कामांसाठी वापरता येणार आहेत.
-
परवडणारी किंमत : हा अधिकृत उतारा नागरिकांना केवळ ₹१५/- या नाममात्र शुल्कात उपलब्ध होणार आहे, ज्यामुळे मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.
-
तलाठ्याच्या सहीची गरज नाही : उताऱ्यावर डिजिटल स्वाक्षरी असल्यामुळे तलाठ्याच्या प्रत्यक्ष सहीची किंवा स्टॅम्पची गरज संपली आहे. यामुळे नागरिकांना महसूल कार्यालयात वारंवार चकरा मारण्याचे कष्ट वाचले आहेत.
-
अचूकता आणि सुरक्षितता : हे उतारे डिजिटल स्वाक्षरी, QR कोड आणि १६ अंकी पडताळणी क्रमांकासह उपलब्ध असतील. यामुळे त्यांची सत्यता ऑनलाइन तपासणे सोपे होईल आणि बनावटगिरीला पूर्णपणे आळा बसेल.
-
सुविधा आणि उपलब्धता : नागरिक https://mahabhumi.gov.in/ या संकेतस्थळावर तसेच ग्राम महसूल माहिती केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्रातून हा उतारा कधीही मिळवू शकतात.









































































