Last Updated on 12 May 2023 5:39 PM by Sanjay Patil/Adhorekhit
कोल्हापूर । जेव्हा विद्यार्थ्याच्या हातातील मातीने वेगळा आकार घेतला तेव्हा विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर झळकणारी समाधानाची भावना उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळा आत्मविश्वास देवून गेली. निमित्त होते… लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व स्मृती शताब्दी वर्ष सांगतेनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय आयोजित गौरव काईंगडे यांची मातीकाम कला (पॉटरी) प्रशिक्षण कार्यशाळेचे…सकाळच्या सत्रात शाहू मिलच्या सांस्कृतिक सभागृहात पार पडलेल्या
या कार्यशाळेत इयत्ता 5 वी ते 10 वीचे सुमारे 250 हून अधिक विद्यार्थी सामिल झाले होते. प्रारंभी श्री. काईंगडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना माती कामाविषयी प्राथमिक माहिती देवून त्यांच्यातील जिज्ञासेला चालना दिली. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी मातीच्या गोळ्यापासून विविध आकार बनवले. विशेष म्हणजे, मुलांच्या आनंदात काही पालकही स्वत: छोटे झाल्याचे दिसून आले.

श्री. काईंगडे यांनी प्रात्यक्षिकाव्दारे मातीच्या गोळ्यापासून विविध भांडी बनविली. त्यांच्या या कौशल्याला विद्यार्थ्यांनीच नाही तर उपस्थित पालकांसह ज्येष्ठांनीही दाद दिली. यावेळी मुलांनीही मोठ्या तन्मयतेने माती भांडी काम प्रशिक्षणाचा आस्वाद घेतला.
वाठार गावचे श्री. काईंगडे यांची टेराकोरा कला ही साधारणता कुंभार कलेशी साधर्म्य साधणारी परंतु पारंपरिक कुंभार कलेपासून थोडीशी वेगळी कला आहे. या कलेला आधुनिकतेचा साज चढवून विद्यार्थी, नागरिक यामध्ये आपले करिअर घडवू शकतात. याप्रसंगी दळवीज आर्ट्सचे प्राचार्य अजय दळवी, प्रमोद पाटील, पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड, आदित्य बेडेकर यांच्यासह अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.













































































