Last Updated on 29 Sep 2022 10:36 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली | एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 2022-23 मध्ये क्षेत्र विस्तार कार्यक्रमांतर्गत फळे, फुले, मसाला लागवड व जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन हा घटक राबविण्यात येत आहे. यामध्ये विदेशी फळे, फुले, मसाला लागवड व आंबा, चिकू, संत्रा व मोसंबी या फळपिकांच्या जुन्या बागांचे पुनरूज्जीवन या बाबींचा समावेश आहे. विदेशी फळे, फुले, मसाला लागवड करण्यास इच्छुक व जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन करण्यासाठी आंबा, चिकू, संत्रा व मोसंबी या फळपिकांच्या बागा असलेल्या अधिकाधिक शेतकऱ्यांनी mahadbtmahait.gov.in या महाडीबीटी पोर्टलवर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाचे संचालक डॉ. के. पी. मोते यांनी केले आहे.
फुले लागवड अंतर्गत कट फ्लॉवर्स घटकासाठी अल्प भुधारक शेतकऱ्यांना 1 लाख रूपये प्रति हेक्टर खर्च मर्यादा असून एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल 40 हजार रूपये प्रति हेक्टर अनुदान मर्यादा आहे. तर इतर शेतकऱ्यांसाठी 1 लाख रूपये प्रति हेक्टर खर्च मर्यादा असून एकूण खर्चाच्या 25 टक्के किंवा कमाल 25 हजार रूपये प्रति हेक्टर अनुदान मर्यादा आहे. कंदवर्गीय फुले या घटकासाठी अल्प भुधारक शेतकऱ्यांना 1 लाख 50 हजार रूपये प्रति हेक्टर खर्च मर्यादा असून एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल 60 हजार रूपये प्रति हेक्टर अनुदान मर्यादा आहे. तर इतर शेतकऱ्यांसाठी 1 लाख 50 हजार रूपये प्रति हेक्टर खर्च मर्यादा असून एकूण खर्चाच्या 25 टक्के किंवा कमाल 37 हजार 500 रूपये प्रति हेक्टर अनुदान मर्यादा आहे. सुटी फुले या घटकासाठी अल्प भुधारक शेतकऱ्यांना 40 हजार रूपये प्रति हेक्टर खर्च मर्यादा असून एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल 16 हजार रूपये प्रति हेक्टर अनुदान मर्यादा आहे. तर इतर शेतकऱ्यांसाठी 40 हजार रूपये प्रति हेक्टर खर्च मर्यादा असून एकूण खर्चाच्या 25 टक्के किंवा कमाल 10 हजार रूपये प्रति हेक्टर अनुदान मर्यादा आहे.
मसाला पीक लागवड अंतर्गत बिया व कंद वर्गीय मसाला पिकांसाठी 30 हजार रूपये प्रति हेक्टर खर्च मर्यादा असून एकूण खर्चाच्या 40 टक्के रक्कम 12 हजार रूपये प्रति हेक्टर अनुदान मर्यादा आहे. तर बहुवर्षिय मसाला पिकांसाठी 50 हजार रूपये प्रति हेक्टर खर्च मर्यादा असून एकूण खर्चाच्या 40 टक्के रक्कम 20 हजार रूपये प्रति हेक्टर अनुदान मर्यादा आहे.
विदेशी फळपिक लागवड अंतर्गत ड्रॅगनफ्रुट, अंजीर व किवी साठी 4 लाख रूपये प्रति हेक्टर खर्च मर्यादा असून एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल 1 लाख 60 हजार रूपये प्रति हेक्टर अनुदान मर्यादा आहे. स्ट्रॉबेरीसाठी 2 लाख 80 हजार रूपये प्रति हेक्टर खर्च मर्यादा असून एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल 1 लाख 12 हजार रूपये प्रति हेक्टर अनुदान मर्यादा आहे. पॅशनफ्रुट, ब्लुबेरी, तेंदुफळ व अवॅकॅडो साठी 1 लाख रूपये प्रति हेक्टर खर्च मर्यादा असून एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल 40 हजार रूपये प्रति हेक्टर अनुदान मर्यादा आहे.
जुन्या फळबागांच्या पुनरूज्जीवन करीता 40 हजार रूपये प्रति हेक्टर खर्च मर्यादा असून खर्चाच्या 50 टक्के व जास्तीत जास्त 20 हजार रूपये प्रति हेक्टर अनुदान मर्यादा आहे.










































































